नाशिक : मोबाइल चोरीच्या संशयावरून तरुणावर हल्ला; दोघांना अटक, तिसरा फरार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

मोबाइल चोरल्याचा संशय घेत तिघांनी मिळून एकावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना राज्य कर्मचारी वसाहत परिसरात घडली. यात शुभम किरण राजगुरू हा तरुण गंभीर जखमी झाला. या प्रकरणी गंगापूर पोलिसांनी दोन संशयितांना अटक केली आहे.

शुभमची पत्नी ऋतुजा राजगुरू हिने दिलेल्या फिर्यादीनुसार, गंगापूर पोलिस ठाण्यात तिघांविरोधात जिवे मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित नारायण कांबळे (रा. शिवाजीनगर), दीपक राजेंद्र चव्हाण (३१) व प्रेम प्रदीप व्याळीज (१८, दोघे रा. ध्रुवनगर) यांनी शुभमवर मोबाइल चोरीचा संशय घेतला होता. शनिवारी (दि. ८) रात्री 8 ला अशोकनगर येथील राज्य कर्मचारी वसाहत येथे चोरीचा आरोप करीत त्यांनी त्याला बेदम मारहाण केली. संशयितांनी दांडक्याने मारहाण करीत हत्याराने वार करून शुभमवर प्राणघातक हल्ला केला. यात शुभम गंभीर जखमी झाला. या प्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी तपास करून संशयित दीपक चव्हाण व प्रेम व्याळीज यांना अटक केली, तर नारायण कांबळे हा संशयित फरार आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित दीपक व प्रेम हे दोघे शुभमला मारहाण करीत असताना तिथे बसलेल्या एकाने ह्या दोघांना ‘काय झालं?’ अशी विचारल्यावर दोन्ही संशयितांनी, ‘याने मोबाइल चोरला’, असे सांगितले. त्यावर संबंधित व्यक्तीने, ‘मारताय कशाला, मारूनच टाका’, असे म्हणत दोघांना गंभीर गुन्हा करण्यास प्रवृत्त केले. त्यानंतर दोघांनी धारदार शस्त्राने वार करीत शुभमवर प्राणघातक हल्ला केला. दरम्यान, घटनाक्रम जाणून घेण्याचा प्रयत्न पोलिस करीत आहेत.

हेही वाचा : 

The post नाशिक : मोबाइल चोरीच्या संशयावरून तरुणावर हल्ला; दोघांना अटक, तिसरा फरार appeared first on पुढारी.