नाशिक : येवल्यात शिक्षण विभागाच्या वरिष्ठ सहाय्यकास लाच घेताना अटक

लाच लुचपतच्या जाळ्यात

नाशिक (येवला) : पुढारी वृत्तसेवा

जिल्हाभर लाचखोर अधिकाऱ्यांना पकडण्याच्या घटना सुरू असताना त्यातच येवला येथील पंचायत समितीच्या शिक्षण विभागाच्या वरिष्ठ सहायकास दोन हजार रुपयाची लाच घेताना पकडले आहे. गेल्या महिन्यातील येवल्यातील ही तिसरी घटना आहे. या घटनेत तक्रारदार उपशिक्षक असून त्यांचे व त्यांचे पत्नीचे अंतिम देयक तयार करून देण्यासाठी दोन हजाराची लाच स्वीकारतांना येवला पंचायत समितीतील वरिष्ठ सहाय्यकास लाचलुचपत विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले आहे.  संजय रामदास पाटील असे या लाच मागणाऱ्या वरिष्ठ सहाय्यकाचे नाव आहे.

जिल्ह्यातील शिक्षण विभागासह इतर शासकीय कार्यालयातील लाच खोरीच्या घटना व त्यावर होणारी चर्चा ताज्या असतानाच पुन्हा येथील पंचायत समितीतील शिक्षण विभागात एक लाचखोर वरिष्ठ सहाय्यक लाच घेताना पकडला गेला आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा जिल्ह्याचे शिक्षण क्षेत्र हादरले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार उपशिक्षक असून त्यांचे व त्यांचे पत्नीचे अंतिम देयक तयार करून देण्यासाठी वरिष्ठ सहाय्यक ही रक्कम मागत होता. दरम्यान या कारवाईनंतर शिक्षण विभागामध्ये खळबळ उडाली असून वरिष्ठ सहाय्यक पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाचलुचपत विभागाच्या पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, अप्पर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक साधना भोये-बेलगावकर करीत आहे.

दरम्यान, जूनच्या पहिल्या आठवड्यात येथे एका पोलिसाला तर मेच्या पहिल्या आठवड्यात पंचायत समितीच्या एका विस्तार अधिकाऱ्यालाही लाच घेताना पकडले आहे. त्यानंतर ही तिसरी घटना आहे.

हेही वाचा : 

The post नाशिक : येवल्यात शिक्षण विभागाच्या वरिष्ठ सहाय्यकास लाच घेताना अटक appeared first on पुढारी.