नाशिक : चोवीस लाख ग्राहकांना १७ कोटी 43 लाखांचा परतावा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

महावितरणच्या नाशिक परिमंडळाने सन २०२२-२३ मध्ये वीजग्राहकांकडून सुरक्षा ठेव म्हणून जमा केलेल्या रकमेवरील व्याजापोटी ग्राहकांना तब्बल १७ कोटी ४३ लाख २६ हजार रुपयांचा परतावा केला. परिमंडळातील नाशिक, मालेगाव व नगर जिल्ह्यांतील २३ लाख ८५ हजार १०८ हा परतावा मिळाला असून, त्यांच्या मागील दोन महिन्यांतील बिलातून तो समायोजित करण्यात आला आहे.

महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या निर्देशानुसार सर्व वर्गवारीतील वीजग्राहकांनी महावितरणकडे सुरक्षा ठेव जमा करणे बंधनकारक असते. सुरक्षा ठेवीवर दरवर्षी महावितरणकडून ग्राहकांना व्याजाचा परतावा दिला जातो. त्यासाठी ग्राहकाने भरलेल्या सुरक्षा ठेव रकमेवर आरबीआयच्या दराच्या सममूल्य दराने ग्राहकांना व्याजाची रक्कम वीजबिलाद्वारे समायोजित करण्यात येते. त्यानुसार २०२२-२३ मध्ये नाशिक परिमंडळा अंतर्गत नाशिक, मालेगाव व नगर मंडळांतील ग्राहकांना १७ कोटी ४३ लाख २६ हजार रुपयांच्या व्याजाचा परतावा दोन महिन्यांच्या वीजबिलांच्या माध्यमातून समायोजित करण्यात आला आहे.

महावितरणने जमा असलेल्या सुरक्षा ठेवींवरील व्याजापोटी नाशिक व मालेगाव मंडळा अंतर्गत १४ लाख ३३ हजार ८४२ ग्राहकांना १० कोटी २४ लाख ३६ हजार रुपयांचा परतावा केला आहे. ही रक्कम ग्राहकांच्या वीजबिलामध्ये समायोजित करण्यात आली आहे. तसेच नगर मंडळात ९ लाख ५१ हजार २६६ ग्राहकांना ७ कोटी १८ लाख ८९ हजार रुपयांचा परतावा दिल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले.

नाशिक मंडळात मिळालेला परतावा

महावितरणने नाशिक मंडळा अंतर्गत चांदवड विभागात १ लाख ६२ हजार ९१७ ग्राहकांना ८६ लाख ४७ हजार, नाशिक ग्रामीणमध्ये २ लाख ४३ हजार ३३४ ग्राहकांना १ कोटी ७७ लाख १४ हजार, नाशिक शहर-१ मध्ये २ लाख १८ हजार ४०६ ग्राहकांना २ कोटी ५४ लाख ९३ हजार, तर नाशिक शहर-२ अंतर्गत ४ लाख ५० हजार ४८६ ग्राहकांना ३ कोटी ६ लाख ३७ हजार रुपयांचा परतावा समायोजित केला.

हेही वाचा : 

The post नाशिक : चोवीस लाख ग्राहकांना १७ कोटी 43 लाखांचा परतावा appeared first on पुढारी.