नाशिक : लम्पीपासून वाचण्यासाठी माझा गोठा, स्वच्छ गोठा मोहीम

Lumpy

नाशिक : पुढारी वृत्तसेेवा

गेल्या आठवड्यात जिल्ह्यातील दोन पशू लम्पी स्किन आजाराने मृत झाल्यानंतर प्रशासन सतर्क झाले आणि तातडीने लसीकरण मोहीम राबविण्यावर भर देण्यात येत आहे. मालेगाव तालुक्यात लम्पी आजाराचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागातर्फे ‘माझा गोठा स्वच्छ गोठा’ ही मोहीम सुरू करून परिसरातील सर्व गोवंशीय पशूंची तातडीने तपासणी आदी उपाययोजना करण्यास सुरुवात झाली आहे.

या आजाराचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी अधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात जनजागृती करावी. जनजागृतीसाठी सामाजिक माध्यमांचाही वापर करावा. लम्पी आजारावर उपयुक्त असणाऱ्या लस आणि औषधांची उपलब्धता यासाठी जिल्हा नियोजन समितीमार्फत प्रत्येक जिल्ह्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा. लम्पी आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी खासगी पशुधन पर्यवेक्षक यांच्या सहकार्यातून लसीकरण मोहीम हाती घ्यावी, अशा सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

नाशिकच्या मालेगावात 1 लाख 10 हजार 134 पशुधनापैकी 32 पशुवैद्यकीय दवाखान्यातून 65 हजार 500 पशुधनाचे लसीकरण पूर्ण झाले आहे. लसीकरण आणि वेळीच उपचार घेतल्यास लम्पी आजार बरा होऊ शकतो. मालेगावातील टाकळी गावात 11 जुलैला एका बैलाला लम्पीसदृश रोगाची लागण झाली होती. मात्र उपचारानंतर बैल पूर्णपणे बरा झाला आहे. मागील लसीकरणाचा मोठा फायदा झाल्याने यंदा जास्त प्रमाणात लम्पीसदृश जनावरे आढळली नाहीत. गेल्या वर्षी लम्पी रोगाच्या साथीत मालेगावात 13 जनावरे दगावली होती. दरम्यान, लम्पी हा व्हायरल विषाणुजन्य रोग असून लसीकरण आणि वेळीच उपचार घेतल्यास रोग बरा होऊ शकतो.

हा रोग माशा, डास, गोचिड इत्यादी कीटकांमार्फत पसरत असल्याने प्रत्येक ग्रामपंचायतीने पशुसंवर्धन विभागाने शिफारस केलेल्या औषधांची फवारणी करावी. त्यासाठी जिल्हा नियोजन समितीमार्फत आणि जिल्हा परिषद सेस यातून औषधे व इतर बाबींसाठी निधी उपलब्ध करून द्यावा, असेही सांगण्यात आले आहे. लम्पी चर्मरोग हा पशुधानातील वेगाने पसरणारा संसर्गजन्य आजार आहे. त्वरित उपचार सुरू केल्यास तो निश्चितपणे बरा होतो. या रोगाने पशुधन दगावण्याचे प्रमाण अत्यल्प आहे.

हेही वाचा : 

The post नाशिक : लम्पीपासून वाचण्यासाठी माझा गोठा, स्वच्छ गोठा मोहीम appeared first on पुढारी.