नोकरदार महिलांनो, आरोग्याकडे लक्ष द्या..!

नाशिक : दीपिका वाघ
प्रत्येक महिलेची गर्भावस्था ही वेगवेगळी असते. वयाच्या आठव्या, नवव्या वर्षी मासिक पाळी सुरू होणे आता स्वीकारले गेले असले तरी चाळिशीत मासिक पाळीत प्रमाणापेक्षा जास्त रक्तस्राव होण्याचे प्रमाण वाढले आहे. पाळीत कमी रक्तस्राव होणे आणि प्रमाणापेक्षा जास्त रक्तस्राव होणे ही दोन्ही संसर्गाची लक्षणे मानली जात असल्याचे तज्ज्ञ सांगतात.

नोकरदार महिलांमध्ये दोन प्रकार असतात. एक पॅशनेटली आपले करिअर फॉलो करणार्‍या ज्यांच्या घरात कामाला नोकरचाकर असतात आणि दुसर्‍या कुटुंबाला हातभार लागावा म्हणून घरातली सर्व कामे करून नोकरी किंवा रोजंदारीवर कामाला जाणार्‍या महिला. घरकाम करून नोकरी करणार्‍या महिलांना स्वत:कडे लक्ष द्यायला वेळ मिळत नाही. दिवसभर कामाच्या चक्रात आरोग्याबाबत बर्‍याचदा चालढकल केली जाते. या आणि अशा अनेक महिलांमध्ये ‘हेवी पिरियडस’ म्हणजे अधिक रक्तस्राव होण्याचे प्रमाण वाढले आहे. मासिक पाळीत साधारण महिलेचे 30 ते 70 एमएल रक्त जाते. ते कसे ओळखायचे तर रक्तस्रावात गुठळ्या जात असतील, सतत पॅड बदलावा लागत असेल तर ते हेवी पिरियडस समजावे. तरुणींमध्ये जास्त रक्तस्राव होत असेल तर फारसे गांभीर्याचे कारण नसते, परंतु चाळिशीत प्रमाणापेक्षा जास्त रक्तस्राव होत असेल तर ती धोक्याची घंटा ठरू शकते. साधारण असा काळ मोनोपॉज सुरू होण्याच्या वर्षभर आधी सुरू होतो पण आता चाळिशीत हेवी पिरियडसचे प्रमाण वाढले आहे. याचे कारण इनबॅलन्स हार्मोन आहे. गर्भाशयात गाठ, लसिका ग्रंथी असल्यास किंवा ओव्हरीमध्ये सिस्ट तयार झाल्यास हार्मोनल दोष तयार होऊन हेवी पिरियडस यायला सुरुवात होते.

हार्मोन इनबॅलन्स का होतात?
फास्ट फूड, जास्त बैठे कामामुळे ओबेसिटी, पीसीओडीसारख्या समस्या वाढतात. चालणे फिरणे कमी झाल्याने हार्मोन्स इनबॅलन्सचे प्रमाण वाढते आणि महिलांच्या शरीरात गुंतागूंत तयार होते. वय आणि उंचीनुसार वजन असावे. याचे प्रमाण बिघडल्यास शारीरिक तक्रारी सुरू होतात. म्हणून महिलांनी स्वत:च्या शरीराची काळजी घ्यायला हवी.

40 ते 45 वयात मासिक पाळीतील नियमित रक्तस्रावापेक्षा अधिक रक्तस्राव होत असेल तर फार घाबरण्याचे कारण नसते परंतु फायब्रॉइड, ओव्हरीमध्ये गाठी असल्याने तसेच हॉर्मोन्स इनबॅलन्स झाल्याने जास्त रक्तस्राव होत असतो. त्यासाठी किमान वर्षातून एकदा तरी प्रत्येक महिलेने तपासणी करणे गरजेचे असते. आजाराचे निदान झाल्यावर उपचार लगेच करता येतात. – डॉ. रविराज खैरनार, स्त्रीरोगतज्ज्ञ.

हेही वाचा:

The post नोकरदार महिलांनो, आरोग्याकडे लक्ष द्या..! appeared first on पुढारी.