नाशिक : वडिलांच्या अंत्यसंस्कारांसाठी कुटुंब गावी गेले अन् चोरट्यांनी डाव साधला

नाशिक, सातपूर : पुढारी वृत्तसेवा 
वडिलांच्या अंत्यसंस्कारांसाठी घरातील सर्व सदस्य गावी गेले असता स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी श्रमिक नगर परिसरात चोरट्यांनी घरफोडी करत लाखो रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना घडली आहे.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. १५ ते १६ ऑगस्ट दरम्यान श्रमिक नगर भागातील आयटीआय कॉलनीत राहणारे सचिन बुटाले हे कुटुंबासमवेत वडिलांच्या अंत्यसंस्कारासाठी वाशीम येथे गेले.

बुटाले यांचे भाचे घऱी होते मात्र, पहाटे चार वाजता जॉगिंग साठी ते गेले असता चोरट्यांनी दाराचा कडी-कोयंडा तोडून घरात प्रवेश केला. बेडरूम मधील लोखंडी कपाटाच्या आतील लॉकर तोडून सहा तोळे सोने आणि ९२ हजाराची रोख रक्कम असा एकूण दोन लाख चार हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला.

या घरफोडीत घरातील लोकांनी १५ तोळे सोने व रोख रक्कम गेल्याचे सांगितले आहे. याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सातपूर परिसरात चोरीचे सत्र सुरूच आहे. काही महिन्यांपूर्वी संदीपनगर येथे उद्योजक बी.जी नागरगोजे यांच्या बंगल्यात भर दिवसा दरोडा पडला होता. अशोकनगर, जाधव संकुल भागात एटीएम तोडफोडीसह, पेट्रोल, सायकल यासह जबरी चोरी व भुरट्या चोरीच्या घटना निरंतर घडतच आहेत. परिसरात रात्री अपरात्री मोकळ्या जागी, बंद व्यावसायिक संकुल या ठिकाणी बसणाऱ्या टवाळखोरांवर कारवाई करावी व बंदोबस्त वाढवावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते संदीप पवार यांनी केली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली राजू पठाण सहायक पोलीस निरीक्षक हे तपास करीत आहे.

हेही वाचा :

The post नाशिक : वडिलांच्या अंत्यसंस्कारांसाठी कुटुंब गावी गेले अन् चोरट्यांनी डाव साधला appeared first on पुढारी.