नाशिक : शहरातील बसस्थानकांची सुरक्षा वार्‍यावर; खासगी वाहतूकदारांची मुजोरी

बस www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
शहरातील बहुतांश बसस्थानकांमधील सीसीटीव्ही कॅमेरे हे देखभाल – दुरुस्तीअभावी बंद पडले आहेत. त्यातच कोरोनापासून बसस्थानकांमध्ये तैनात सुरक्षारक्षकांच्या संख्येतही कपात करण्यात आल्याने प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. भुरट्या चोर्‍यासह महिलावर्गाच्या छेडछाडीच्या घटनांमध्ये वाढ झाली असून, टवाळखोरांचा उपद्रव वाढल्याने बसस्थानके असुरक्षित झाली आहेत. एसटी महामंडळासह पोलिसांकडून दुर्लक्ष केले जात असल्याने चोरट्यांसह टवाळखोरांना मोकळे रान मिळत आहे.

शहरात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे सहा बसस्थानके आहेत. त्यापैकी सातपूर वगळता मुंबई नाका (महामार्ग), ठक्कर बाजार, जुने सीबीएस, निमाणी, नाशिकरोड आदी बसस्थानकांतून लांब पल्ल्याच्या गाड्या सोडण्यात येतात. या बसस्थानकांत प्रवाशांची कायमच वर्दळ असते. त्यामुळे शहरातील बसस्थानके सुरक्षेच्या द़ृष्टीने संवेदनशील झाली आहेत. या बसस्थानकांची सुरक्षा वाढविण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आली होती. या कॅमेर्‍यांच्या मदतीने बसस्थानकांतील सर्व हालचालींवर नजर ठेवण्याचे नियोजन होते. मात्र, ठक्कर बाजार वगळता इतर बसस्थानकांमधील कॅमरेच बंद आहेत. एसटी महामंडळाच्या बसस्थानक परिसरात खासगी वाहतूकदारांना 200 मीटर अंतरात प्रतिबंध असताना सर्व बसस्थानकांमध्ये मात्र खासगी वाहनचालक मुजोरी करून थेट एसटीचे प्रवासी पळवित आहेत. सुरक्षारक्षकांची संख्या कमी असल्याने बसस्थानकांतील बेशिस्तपणा वाढला आहे. याबाबत एसटीच्या अधिकार्‍यांनी पोलिसांकडे वारंवार तक्रारी केलेल्या आहेत. मात्र, पोलिसांचा कानाडोळा होत असल्याने दररोज बसस्थानकात वाद होत आहेत. बसस्थानकांना खासगी वाहतूकदारांसह एजंट्सचा विळखा पडल्याने सर्वसामान्य प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. प्रवाशांसह एसटीच्या अधिकार्‍यांना धमकाविण्यापर्यंत खासगी वाहतूकदारांची मुजोरी वाढली आहे. दरम्यान, बसस्थानक परिसरात नियमित गस्त होण्यासाठी एसटी प्रशासनाकडून पोलिसांकडे वारंवार पाठपुरावा करण्यात येत आहे. त्याबाबतचा पत्रव्यवहार सुरू आहे. मात्र, एसटीच्या मागणीकडे पोलिस प्रशासनाकडून दुर्लक्ष करण्यात येत असल्याने बसस्थानकात येणार्‍या प्रवाशांच्या सुरक्षितेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

नाशिक : पंचवटीतील निमाणी बसस्थानकातील सीसीटीव्ही बंद असल्याने सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. (छाया: रुद्र फोटाे)

सुरक्षारक्षकांच्या संख्येतही कपात…
एसटी महामंडळाने सुरक्षारक्षक नेमण्यासाठी महाराष्ट्र माजी सैनिक महामंडळ अर्थात ‘मेस्को’सोबत करार करण्यात आला आहे. लॉकडाउनपूर्वी बसस्थानकाचे क्षेत्र व प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन प्रत्येक ठिकाणी सहा ते नऊ सुरक्षारक्षक तैनात करण्यात येत होते. मात्र, कोरोना खर्चकपातीच्या नावाखाली बसस्थानकात नियुक्त सुरक्षारक्षकांवर बेकारीची कुर्‍हाड कोसळली. सुरक्षारक्षकांची संख्या कमी करण्यात आली. सध्या बसस्थानकांमध्ये अवघे तीन सुरक्षारक्षक नियुक्त करण्यात येत आहेत.

बस www.pudhari.news
नाशिक : बसस्थानकामध्ये अशाप्रकारे दुचाकी उभ्या केल्या जातात. (छाया : रुद्र फोटो)

बसस्थानके झाली बकाल…
खासगी वाहने थेट बसस्थानकाच्या आवारात आणली जातात. प्रवासी वाहतूक करणार्‍या रिक्षासुद्धा बसस्थानकाच्या आत उभ्या केल्या जातात. दुचाकींच्या पार्किंगचीही समस्या वाढल्याने बसस्थानके बकाल झाली आहेत. रात्रीच्या सुमारास बसस्थानकातील मोकळ्या परिसरात टवाळखोर आणि मद्यपींचा उपद्रव वाढला आहे. त्यातूनच बसस्थानकाची सुरक्षितता धोक्यात आली आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : शहरातील बसस्थानकांची सुरक्षा वार्‍यावर; खासगी वाहतूकदारांची मुजोरी appeared first on पुढारी.