नाशिक : वसतिगृहातील धक्कादायक प्रकार; विद्यार्थीनींना जबरदास्ती नाच करण्यास सांगितले

त्र्यंबकेश्वर www.pudhari.news

नाशिक (ञ्यंबकेश्वर) : पुढारी वृत्तसेवा

ञ्यंबकेश्वर तालुक्यातील निसर्गरम्य पहिणे येथील खासगी संस्थेच्या वसतिगृहातील अल्पवयीन विद्यार्थींनींना जबरदास्ती नाच करण्यास सांगीतले जाते म्हणून पालकांनी तातडीने धाव घेत मुलींना घरी आणले आहे. त्याबाबत संस्थेचे संचालक आणि एक शिक्षीका यांच्या विरूध्द वाडीव-हे पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, ञ्यंबकेश्वर तालुक्यातील पहिणे गावच्या चिखलवाडी येथील सर्वहारा परिवर्तन केंद्र संस्थेचे वसतिगृह आणि शेजारीच असलेले जी 7 नेचर पार्क नावाचे रिसॉर्ट येथे वसतिगृहातील आदिवासी अल्पवयीन मुलींना काजवा महोत्सवात पर्यटकांच्या समोर नाच करण्यास भाग पाडले. येथील शिक्षिका आणि संस्थाचालक जबरदस्ती असे प्रकार करत असल्याचे एका मुलीने तिच्या वडिलांना फोनवर कळवले. याबाबत पालकांनी धाव घेत मुलींना तेथून सोडवले व वाडीवऱ्हे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. चिखलवाडी येथील हे वसतिगृह शासनाची कोणतीही मान्यता नसलेले आहे. यावर्षी ३१ मे २०२३ रोजी येथे ४० मुलींना दाखल करून घेण्यात आले आहे. सर्व मुली 7 वी ते इयत्ता 9 वीच्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या असून त्यांच्या पालकांनी मुलींसाठी प्रत्येकी 3500 रूपये अनामत रक्कम म्हणून जमा केली आहे. शाळा सुरू होण्यास १५ दिवसांचा अवधी बाकी असताना मुलींना संगणक शिक्षण देण्याच्या नावाखाली येथे आणण्यात आले. दरम्यान संस्थेच्या शाळेच्या पाठीमागच्या बाजूस टेकडीवर जी ७ नेचर पार्क नावाचे रिसोर्ट आहे. तेथे  होत असलेल्या नाचात जबरदस्तीने सहभाग घ्यावा लागत होता. या रिसॉर्टवर काजवा महोत्सव आयोजीत केला असता रात्रीच्या वेळेस शेकोटी नृत्य  करण्यात आले होते. पर्यटक नाच करत असतांना त्यामध्ये येथील अल्पवयीन विदयार्थीनींना देखील नाचण्यास जबरदस्ती करण्यात आली. नाचले नाही तर शिक्षिका दमदाटी करत असे व छड्या देत होती. याबाबत मुलीनी पालकांना सांगितल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. बुधवार, दि. 14 जून 2023 रोजी पाच मुलींचे पालक वस्तीगृहावर गेले असता मुलींनी त्यांना घडलेला सर्व प्रकार सांगीतला. त्यामुळे तातडीने मुलींना घेऊन पालक घरी गेले. त्यानंतर सर्व पालकांनी विचार विनीमय करून रविवार दि. 18 जून 2023 रोजी वाडीव-हे पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली आहे. तसेच पालकांनी आपले 3500 रूपये परत मिळालेले नाही असे देखील तक्रारीत म्हटले आहे.

या वर्षी प्रथमच होस्टेल सुरू झाले असून मुली मधूनच सोडुन जातात म्हणून त्यासाठी 3500 रूपये अनामत घेतली जाते. दरम्यान वसतिगृहात मुली निवासी आहेत. त्यांच्या जेवणासाठी जवळच कॅन्टीन आहे. तेथे वसतिगृहाच्या  शिक्षीका मुलींना पारंपारीक नृत्य शिकवत होत्या. तेथे आलेले पर्यटक ते पाहत असतील परंतु मुलींना कोणत्याही प्रकारे इतरांसमोर नाच करण्यास सांगितलेले नाही असा दावा केला आहे. – वसतिगृहातील एक शिक्षक.

ञ्यंबक तालुक्यात याबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहे. शाळेच्या विद्यार्थ्यांकडून फी घेतली जाते मात्र वस्तीगृहातील निवासी मुलींकडून कोणतीही फी घेतली जाणार नसल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच मे महिन्यात जाहीरात करून दुर्गम भागातून मुलींना आणले. विशेष म्हणजे पालकांना सांगतांना संगणक प्रशिक्षण देणार अशी हमी दिली. मात्र प्रत्यक्षात 15 दिवस कोणतेही शिक्षण दिलेले नाही. याबाबत आता आश्चर्य व्यक्त होत आहे. ञ्यंबक तालुक्यातील दुर्गम आदिवासी भागात आश्रमशाळांच्या नावाने होत असलेले प्रकार गंभीर आहेत. याबाबत शिक्षण विभागाकडे विचारणा केली असता त्यांनी आपणास काहीही माहित नाही असे म्हणत हात वर केले आहेत.

त्र्यंबकेश्वर www.pudhari.news

तसेच याबाबत कष्टकरी एल्गार संघटनेने आक्रमक पवित्रा घेतला असून संस्थापक अध्यक्ष भगवान मधे यांनी मंगळवारी दि.20 महिला व बालकल्याण अधिकारी, महिला आयोग, समाज कल्याण विभाग, आदिवासी विकास विभाग, जिल्हाधिकारी व पोलीस अधिकारी यांची भेट घेऊन संबंधीत संस्थाचालक, रिसॉर्टचालक आणि शिक्षक यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. पहिणे भागातील सर्व हॉटेल आणि रिसॉर्ट यांची तपासणी करण्यात यावी असे देखील त्यांनी म्हटले आहे.

चिखलवाडीच्या वसतिगृहातून परतलेल्या मुलींना शासकीय वस्तीगृहात प्रवेश देऊन त्यांचे शैक्षणिक नुकसान थांबवावे. तसेच त्यांच्या विद्यार्थी जीवनाशी खेळ करणारा संस्था चालक आणि शिक्षक यांच्यावर अनुसुचित जाती जमाती अन्याय प्रतिबंधक कायद्याने गुन्हे दाखल करावेत. – भगवान मधे, अध्यक्ष, एल्गार कष्टकरी संघटना.

The post नाशिक : वसतिगृहातील धक्कादायक प्रकार; विद्यार्थीनींना जबरदास्ती नाच करण्यास सांगितले appeared first on पुढारी.