नाशिक : विनापरवानगी गतिरोधकांना महापालिकेचा ‘ब्रेक’

नाशिक, www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

अपघात रोखता येण्यासाठी शहरातील विविध भागांमध्ये गतिरोधक (स्पीड ब्रेकर) उभारले आहेत. मात्र, बऱ्याच ठिकाणी कोणतीही परवानगी न घेता केवळ स्थानिकांच्या दबावापोटी चुकीच्या पद्धतीने स्पीड ब्रेकर बसविलेले असल्याने याठिकाणी अपघात कमी न होता वाढतच असल्याची बाब समोर आली आहे. याबाबत बऱ्याच तक्रारीही महापालिकेच्या बांधकाम विभागाला प्राप्त झाल्या आहेत. या सर्व बाबींचा विचार करून महापालिकेकडून लवकरच रस्ता सुरक्षा समितीकडून स्पीड ब्रेकरचे फेरसर्वेक्षण केले जाणार असून, त्यात या स्पीड ब्रेकरची खरच गरज आहे काय? याबाबतचा अहवाल सादर केला जाणार आहे. तसेच गरज असेल तिथे नियमाप्रमाणे स्पीड ब्रेकर बसविले जाणार आहेत.

शहरात सध्या चारशेच्या आसपास स्पीड ब्रेकर आहेत. रस्ता सुरक्षा समितीकडून शहरात स्पीड ब्रेकर उभारण्यास मंजुरी दिली जाते. त्यात लोकप्रतिनिधी, महापालिका बांधकाम विभाग, आरटीओ, पाॅलिटेक्निक महाविद्यालये, वाहतूक पोलिस व काही एनजीओंचा सहभाग असतो. या समितीकडे अपघात रोखण्यासाठी शहरातील अनेक रस्त्यांवर स्पीड ब्रेकर्स बसविण्याची नागरिकांकडून मागणी केली जात आहे. परंतु, स्पीड ब्रेकर्सची संख्या नियंत्रित असावी, अशीदेखील मागणी पुढे येत आहे. त्यामुळे मनपा बांधकाम विभाग रस्ता सुरक्षा समितीमार्फत कोठे स्पीड ब्रेकर असावे, कोणत्या रस्त्यावर स्पीड ब्रेकरची गरज नाही याचे सर्वेक्षण करुन सखोल अहवाल तयार केला जाईल.

तसेच रस्ता ओलांडण्यासाठी पादचारी सिग्नल निर्माण करणे व विविध चौकांत, सिग्नल, रस्ता क्रॉसिंग, गतिरोधक असेल तेथे पांढरे पट्टे मारणे, कॅट आय लावणे, फलक लावणे आदी उपाययोजना कराव्या ही मागणी केली जात आहे. लवकरच रस्ता सुरक्षा समितीची बैठक होणार असून, त्यावरील मुद्यांवर काम केले जाणार आहे.

दिव्यांगांचाही होणार विचार

शहरातील बहुतांश रस्त्यांवर रॅम्बलर पद्धतीचे स्पीड ब्रेकर आहेत. त्यावरून मार्गक्रमण करताना अपघातांचे प्रमाण वाढत आहे. नव्या सर्वेक्षणात अशा पद्धतीचे स्पीड ब्रेकरऐवजी स्पीड टेबल स्पीड ब्रेकरवर भर दिला जाणार आहे. या नव्या स्पीड टेबल स्पीड ब्रेकरवर दिव्यांग व्यक्तीदेखील व्हिलचेअरवरून मार्गक्रमण करू शकतील.

२८ ब्लॅक स्पाॅटवर उपाययोजना

मिर्ची चौकातील अपघातानंतर मनपा बांधकाम विभागाने एका संस्थेच्या माध्यमातून उपाययोजनांचे सर्वेक्षण केले. त्यांनी दिलेल्या पर्यायावर लवकरच अंमलबजावणी केली जाणार असून, ठेकेदाराला कार्यारंभ आदेश दिले जाणार आहे. महत्त्वाचे म्हणजे मुंबई नाका सर्कल येथे वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी भुयारी मार्ग केला जाणार आहे. तर द्वारका सर्कलवर नॅशनल हायवेकडून उपाययोजना राबविल्या जाणार आहेत.

हेही वाचा :

The post नाशिक : विनापरवानगी गतिरोधकांना महापालिकेचा 'ब्रेक' appeared first on पुढारी.