नाशिक शहरातील उद्यानांत उभारणार ‘ऑक्सिजन पॉकेट

वृक्ष लागवड,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

महापालिकेच्या उद्यान विभागाकडून शहरातील प्रमुख उद्यानांमध्ये ‘आॅक्सिजन पॉकेट’ उभारले जाणार असून, उद्यान विभाग त्यादृष्टीने कामाला लागला आहे. नाशिकरोड, पूर्व, पश्चिम, सातपूर, पंचवटी, नवीन नाशिक या विभागांत प्रत्येकी एक याप्रमाणे ऑक्सिजन पॉकेट निर्माण केले जाणार आहे. एका पॉकेटमध्ये सुमारे २५ ते ३० हजार वृक्षांची लागवड केली जाणार असल्याची माहिती उद्यान विभागाचे नवनियुक्त अधीक्षक विवेक भदाणे यांनी दिली.

शहरातील उद्यानांवर पालिकेच्या अर्थसंकल्पातून कोट्यवधींचा खर्च केला जातो. त्यातून बाकडे, खेळणी तसेच वृक्षलागवड केली जाते. मात्र, आता मोठ्या उद्यानांमध्ये काही प्रयोग राबविण्याचे उद्यान विभागाने निश्चित केले असून, त्याअंतर्गत ऑक्सिजन पाॅकेट निर्माण केले जाणार आहेत. हे पॉकेट शहरात ऑक्सिजन पुरविण्याचे काम करणार आहेत. मनसेच्या सत्ताकाळात टाटा समूहाच्या मदतीने ‘बॉटनिकल गार्डन’ उभारले गेले. या उद्यानात मोठ्या प्रमाणात वृक्षसंपदा बघावयास मिळते. त्याचबरोबर कुसुमाग्रज उद्यान, पंचवटीत रामसृष्टी, कानेटकर उद्यान, प्रमोद महाजन उद्यान, कलानगरचे आनंदसागर, नाशिकरोडचे सोमाणी गार्डन या उद्यानांमध्ये केलेले प्रयोग नाशिककरांच्या पसंतीस आले. आता ऑक्सिजन पॉकेटचा प्रयोग केला जाणार असून, त्यातून नाशिकचे प्रदूषणविरहित वातावरण निर्माण होण्यास मदत होणार आहे.

शहरातील सहाही विभागांत ऑक्सिजन पॉकेट उभारले जाणार असून, कानेटकर उद्यानाच्या धर्तीवर प्रमुख उद्यानांमध्ये विविध प्रकारच्या फुलझाडांची लागवड केली जाणार आहे. ज्येष्ठांना बसण्यासाठी उत्तम बाकडे, लहानग्यांना खेळण्यासाठी खेळी बसविण्याचे कामेदेखील केली जाणार आहे.

– विवेक भदाणे, उद्यान अधीक्षक, मनपा

कमळकुंड अन् बरेच काही

शहरातील महत्त्वाच्या उद्यानात कमळकुंड, रॉक गार्डन तसेच स्टेप गार्डन अशा संकल्पना राबविल्या जाणार आहेत. नागरिकांना एकाच उद्यानात अनेक प्रकारचे पैलू पाहता येणार आहेत. यासाठी नियोजन सुरू केले असून, काही दिवसांत ते साकारले जाणार आहे.

हेही वाचा :

The post नाशिक शहरातील उद्यानांत उभारणार 'ऑक्सिजन पॉकेट appeared first on पुढारी.