नाशिक : शहरातील ३३३ अपघाती स्थळांवर करणार उपाययोजना

नाशिक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

रस्ता सुरक्षाविषयक उपसमितीने शहरात ३३३ अपघातस्थळे निश्चित केली असून, या स्थळांवरील अपघात, वाहतूक कोंडी टाळण्यासाठी योग्य त्या उपाययोजनांच्या कामांसाठी मंजुरी देण्यात आली आहे. त्यामध्ये झेब्रा क्रॉसिंग, पादचारी क्रॉसिंग, थर्मोप्लास्टिक पट्टे मारणे, गतिरोधक, कॅट आइज, वाहतूक मर्यादेचा फलक लावणे आदी उपाययोजना करण्यात येणार आहेत.

रस्ता सुरक्षा समितीची तिसरी बैठक प्रभारी आयुक्त तथा प्रशासक भाग्यश्री बानायत यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी (दि.३०) मनपा मुख्यालयात पार पडली. यावेळी मनपाच्या अधिकाऱ्यांसह आरटीओ, पोलिस आयुक्तालय, एनएचएआय, एमएसईडीसीएल, पीडब्लूडीचे अधिकारी व संदीप युनिव्हर्सिटीचे डॉ. नाकतोडे, प्रो. शिशिर दधिच उपस्थित होते. शहर अभियंता शिवकुमार वंजारी यांनी मागील बैठकीचे इतिवृत्त वाचून कामांचा आढावा घेतला. शहरातून एकूण ७० किमीचा महामार्ग जातो. राष्ट्रीय महामार्गावरील सहा सिग्नलचे नियंत्रण एनएचआयएकडे होते. मात्र, मागील बैठकीत सिग्नलचे नियंत्रण मनपाने करण्यासाठी विनंती केली व त्यानुसार एनएचआयएने ना हरकत प्रमाणपत्र दिले आहे. मनपाकडून लवकरच गरवारे, पाथर्डी फाटा, वडाळानाका, द्वारका, आडगाव नाका, औरंगाबाद नाका हे बंद असलेले सहा सिग्नल सुरू करण्यासाठी निवीदाप्रक्रिया राबविण्यात आली आहे.

पोलिसांकडून मनपाकडे वेळोवेळी शहरात २२ वाढीव सिग्नलची मागणी झालेली आहे. बैठकीतही गंगापूर रोडवरील चौकांमध्ये सिग्नलची मागणी केली गेली. शहरात एकूण ५३ सिग्नल कार्यरत आहेत. त्यातील ४० स्मार्ट सिग्नल उभारणीची मंजुरी स्मार्ट सिटीकडे आहे. त्यापैकी २० स्मार्ट सिग्नलचे काम प्रगतिपथावर आहे.

बैठकीस पोलिस उपआयुक्त (वाहतूक) मोनिका राऊत, अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी, उपआयुक्त विजयकुमार मुंढे, करुणा डहाळे, लक्ष्मीकांत साताळकर, श्रीकांत पवार, प्रशांत पाटील, अधीक्षक अभियंता उदय धर्माधिकारी, नगररचना उपसंचालक हर्षल बाविस्कर, कार्यकारी अभियंता संदेश शिंदे, सचिन जाधव, जितेंद्र पाटोळे, जनसंपर्क अधिकारी गिरीश निकम, एमएचएआयचे अभियंता शशांक अडके, सिव्हिल टेकतर्फे इंजि. सी. एन. कुलकर्णी, ब्लुमबर्ग संस्थेचे निशांत सावंत, टी. के. जसवंत उपस्थित होते.

शाळा परिसरात सर्व्हे

जागतिक बॅंकेच्या मदतीने ब्लुमबर्ग फिलांथ्रोपीज इनिशिएटिव्ह फॉर ग्लोबल रोड सेफ्टी ही संस्था कार्यरत आहे. या संस्थेने शहरातील नाशिकरोड येथील मनपाच्या मुक्तिधाम शाळा (क्र. ५७) आणि जुन्या आग्रा रोडवरील आदर्श इंग्लिश मीडियम स्कूल परिसराचा रोड सेफ्टीबाबत अभ्यास करून उपाययोजना सुचविल्या आहेत. या संस्थेच्या प्रतिनिधींनी बैठकीत त्याबाबत सादरीकरण केले. शहरातील एकूण ११ शाळांचा सर्व्हे करून तो मनपा, परिवहन विभागाला सादर केला जाणार आहे.

बोगद्याचे रुंदीकरण करणार

इंदिरानगर, राणेनगर येथील पुलाखालील बोगदा रुंदीकरणाचे काम सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यात सुरू होईल, अशी ग्वाही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने यावेळी दिली. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मुंबई नाका येथील सर्कलचा व्यास कमी करावा, अशी सूचना पोलिस उपआयुक्तांनी (वाहतूक) केली. त्या अनुषंगाने तज्ज्ञ एजन्सी म्हणून आयआयटी मुंबई यांची नेमणूक करून व्यास किती असावा, कोणत्या दिशेने किती असावा याचा अभ्यास करणार आहे.

शहरातील अपघातस्थळे

नाशिक पूर्व – ६८

पश्चिम – ३६

पंचवटी – ८९

नाशिकरोड – ४८

नवीन नाशिक – ६०

सातपूर – ३२

एकूण – ३३३

हेही वाचा :

The post नाशिक : शहरातील ३३३ अपघाती स्थळांवर करणार उपाययोजना appeared first on पुढारी.