नाशिक : शहरातील सहा होर्डिंग्ज धोकादायक, ढाचा कधीही कोसळण्याची भीती

hording structure

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

पुणे येथे होर्डिंग दुर्घटनेत पाच नागरिकांचा बळी गेला होता. त्याची पुनरावृत्ती नाशिकमध्ये होण्याची शक्यता आहे. नाशिकमध्ये विविध भागांमध्ये सहा होर्डिग्ज अत्यंत धोकादायक स्थितीत असून, त्यांचा ढाचा कोणत्याही क्षणी कोसळू शकतो. दरम्यान, महापालिकेच्या करसंकलन विभागाने संबंधित एजन्सीला दुरुस्तीसाठी आठ दिवसांची मुदत दिली असून, धोकादायक स्ट्रक्चर हटवून नव्याने उभारणी करण्याबाबतच्या सूचना दिल्या आहेत.

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर खासगी एजन्सींकडून शहरातील ८२३ होर्डिंग्जच्या मजबुती प्रमाणपत्रासाठी ऑडिट पूर्ण करून घेतले. त्यामध्ये सहा होर्डिंग्जचे स्ट्रक्चर अत्यंत धोकादायक असल्याचे निष्पन्न झाले आहे, तर २४० होर्डिंग्जच्या स्ट्रक्चरच्या डागडुजीची नितांत गरज आहे. सध्या पावसाने जोर धरला असून, वादळी वाऱ्यांसह पाऊस आल्यास होर्डिंग्ज कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे होर्डिंग्जधारकांना दरवर्षी स्थिरता प्रमाणपत्र (स्टॅबिलिटी सर्टिफिकेट) महापालिकेच्या विविध कर विभागाला सादर करावे लागते. महापालिका हद्दीतील सर्व जाहिरात होर्डिंग्जची तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला.

तपासणीचे काम संदीप फाउंडेशन, सिटी टेक, मविप्र या संस्थांना दिले होते. प्रारंभी होर्डिंग्जधारकांनी ऑडिट करू देण्यास टाळाटाळ केली होती. त्यामुळे कर संकलन विभागास फिटनेस प्रमाणपत्र सादर करण्यासाठी दि. ३० जूनचा अल्टिमेटम द्यावा लागला होता. त्यानंतर ८२३ होर्डिग्जची स्थिरता तपासणी पूर्ण केली गेली. त्यानुसार सहा होर्डिंग्ज स्ट्रक्चर अत्यंत धोकादायक असून, ते कधीही कोसळून दुर्घटनेची भीती व्यक्त करण्यात आली. त्यात नाशिक पश्चिम विभागात चार, नाशिकरोड व नवीन नाशिकमधील प्रत्येकी एक स्ट्रक्चरचा समावेश आहे. तसेच २४० होर्डिंग्जची त्वरित डागडुजी करण्याचीही गरज आहे. दरम्यान, करसंकलन विभागाने संबंधित होर्डिंग्जधारकांना जुने स्ट्रक्चर पाडून नव्याने उभारण्याची सूचना दिली आहे. तसेच किरकोळ डागडुजी पुढील आठ दिवसांत पूर्ण करावी, अशा सूचना दिल्या आहेत.

शहरातील सहा होर्डिंग्ज स्ट्रक्चर अत्यंत धोकादायक, तर २४० स्ट्रक्चर डागडुजीची गरज आहे. धोकादायक स्ट्रक्चर हटवणे व डागडुजीसाठी आठ दिवसांची मुदत दिली आहे.

– श्रीकांत पवार, उपआयुक्त करसंकलन विभाग, मनपा

हेही वाचा : 

The post नाशिक : शहरातील सहा होर्डिंग्ज धोकादायक, ढाचा कधीही कोसळण्याची भीती appeared first on पुढारी.