पिंपळनेर : गावावर ८० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर तरीही एकाच रात्रीत चार घरफोड्या

पिंपळनेर www.pudhari.news

पिंपळनेर (ता.साक्री) : पुढारी वृत्तसेवा

साक्री तालुक्यातील सामोडे गावातील नवागाव परिसरात चोरट्यांनी एकाच रात्री चार घर फोडून सोने-चांदीचे दागिन्यांसह रोख रक्कम असा एकूण ८ लाखांचा मुद्देमाल लंपास केला. काही महिन्यांपूर्वीच गावात एकाच रात्री दोन वेळा पाच ते सहा घरांमध्ये चोरी झाली होती. त्यानंतर सामोडे ग्रामपंचायतीने गावात ८० सीसीटीव्ही कॅमेरे बसवले. तसेच रात्रीकरीता सुरक्षारक्षक नेमून पोलिसांनीही गावात गस्त वाढवली होती. मात्र, संपूर्ण बंदोबस्त केल्यानंतरही चोरट्यांनी सर्वांच्या हातावर तुरी देत पुन्हा चार घरांवर हात सफाई केली.

 

पिंपळनेर पासून ४ कि.मी.अंतरावरील सामोडे येथील नवागाव परिसरातील शेतकरी अशोक लक्ष्मण घरटे हे रविवार (दि.16) रात्री घराच्या खालच्या मजल्याला कुलूप लावून वरच्या मजल्यावर झोपण्यासाठी गेले. त्यानंतर चोरट्यांनी त्यांच्या घराचा कडीकोयंडा तोडून आत प्रवेश केला. तसेच कपाटातील ११ तोळे सोने व ८५ हजार रोख व किरकोळ चांदी लांबवली. त्यानंतर चोरट्यांनी त्यांचा मोर्चा प्रमिलाबाई अशोक घरटे यांच्या घराकडे वळवला. त्या कामानिमित्ताने बाहेरगावी गेल्या होत्या. ही संधी साधून त्यांच्या घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी ३ तोळे सोने व ५ हजार रोख, किरकोळ चांदी असा मुद्देमाल लांबवला. त्यांनतर चोरट्यांनी गावातील विठ्ठल मंदिराच्या मागच्या बाजूला राहणारे कृष्णा एकनाथ घरटे व रवींद्र रामदास घरटे यांच्या बंद घरांचे कुलूप तोडले. परंतु यावेळी त्यांच्या हाती काहीच लागले नाही. चोरी झाल्यावर चोरट्यांनी गावातून दुचाकीवर पळ काढल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसून आले आहे. चोरीचा प्रकार सोमवारी (दि.17) पहाटे उघडकीस आल्याने त्वरीत पोलिसांना माहिती देण्यात आली. सहायक पोलिस निरीक्षक सचिन साळुंखे यांनी समुहासह घटनास्थळी  पहाणी केली.

पांढऱ्या दुचाकीवरून आले संशयित
घटनेनंतर ग्रामपंचायत पदाधिकारी व पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फुटेजची तपासणी केली. सोमवार (दि.17) पहाटे ४ वाजता पांढरा रंग व नंबर नसलेल्या मोटारसायकलवरून तीन अज्ञात गावात शिरताना दिसून आले. त्यांनी चेहरा झाकला असल्याचे कॅमे-यात दिसून आले आहे.

नागरिकांमध्ये भितीचे वातावरण
गावात फेरीवाले किंवा अनोळखी व्यक्ती बंद घराची पाहणी करून जातात. त्यानंतर रात्री घरफोडी करतात. त्यामुळे बाहेरील ग्रामपंचायत कार्यालयात ओळखपत्र जमा करावे असे आवाहन केले आहे. गावात काही महिन्यांपासून चोऱ्या वाढल्या आहेत. त्यामुळे काही दिवसांपूर्वी गावात ग्रामपंचायतीने ८० सीसीटीव्ही कॅमेरे बसवले. तसेच रात्रीची गस्त घालण्यासाठी गुरखा देखील नेमला. पिंपळनेर पोलिसांनीही गावात रात्रीची गस्त वाढवली आहे. त्यानंतरही चोरट्यांनी गावात धाडसी चोरी केल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

हेही वाचा:

The post पिंपळनेर : गावावर ८० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर तरीही एकाच रात्रीत चार घरफोड्या appeared first on पुढारी.