नाशिक : शासकीय कार्यालयांमध्येच डेंग्यूची उत्पत्ती, ११ कार्यालयांना बजावल्या नोटिसा

डेंग्यू

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

शहरात डेंग्यूचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत असून, शासकीय कार्यालयच डेंग्यू उत्पत्तीचे हॉट स्पॉट ठरत आहेत. नाशिकरोड कारागृहासह ११ शासकीय कार्यालये डेंग्यू उत्पत्तीचे ठिकाणे बनले असून, डेंग्यू फैलावासाठी कारणीभूत ठरत आहेत. दरम्यान, महापालिकेच्या मलेरिया विभागाने या सर्व कार्यालयांना नोटिसा बजावल्या असून, डेंग्यूचा फैलाव होणार नाही, यासाठी साफसफाई व औषध फवारणी करावी अशा सूचना दिल्या आहेत. तसेच डेंग्यू फैलाव प्रकरणी ५१९ नागरिकांना नोटिसा दिल्या आहेत.

शहरात यंदा डेंग्यूची साथ नियंत्रणात असून, सद्यस्थितीत २८ रुग्ण उपचार घेत आहेत. डेंग्यूचा फैलाव टाळण्यासाठी मलेरिया विभाग सतर्क असून, शहरभर तपासणी मोहीम राबवत आहेत. त्याच अनुषंगाने शासकीय कार्यालयांचीही तपासणी केली. त्यात ११ कार्यालयांत डेंग्यू उत्पत्तीचे ठिकाणे असल्याचे निष्पन्न झाले. मलेरिया विभागाने नुकतीच नाशिकरोड कारागृहाची पाहणी केली. तेथे पत्र्याचे डब्बे व सिन्टेक्स टाक्या मोठ्या प्रमाणात आढळल्या. त्यामध्ये पावसाचे पाणी साचून डेंग्यूची अंडी दिसून आली. जे कंटेनर व टाक्या रिकामे करता येत नाहीत तेथे टेमिफॉस या अळीनाशकाचा अथवा गप्पी माशांचा वापर करावा, अशा सूचना दिल्या. तसेच छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर पाणी साचल्याने डेंग्यू उत्पत्तीचे ठिकाणे आढळल्याने जिल्हा परिषद बांधकाम विभागाला नोटीस पाठविण्यात आली आहे. पोलिस वसाहत असलेल्या हेड क्वार्टरमध्ये डेंग्यू उत्पतीचे ठिकाणे आढळले. या सर्व शासकीय कार्यालयांना नोटिसा बजावून साफसफाई करावी, अशा सूचना दिल्या आहेत.

नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहासह डेंग्यू उत्पतीचे ठिकाणे आढळल्याने ११ शासकीय कार्यालयांना नोटिसा देण्यात आल्या. या ठिकाणी डास प्रतिबंधक औषध फवारणी करण्यात आलेली आहे.

– डाॅ.राजेंद्र त्र्यंबके, जीवशास्त्रज्ञ, मलेरिया विभाग, मनपा

हेही वाचा :

The post नाशिक : शासकीय कार्यालयांमध्येच डेंग्यूची उत्पत्ती, ११ कार्यालयांना बजावल्या नोटिसा appeared first on पुढारी.