नाशिक : शिवसेना फुटीला अजित पवारही तेवढेच जबाबदार – गरीश महाजन

गिरीश महाजन www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
शिवसेना ठाकरे गटातील आमदार-खासदार पक्षाला कंटाळले असून, वर्धापनदिनी आ. मनीषा कायंदे यांनी शिंदे गटात प्रवेश करत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना झटका दिला. भविष्यातही उद्धव ठाकरे यांना आणखी झटके बसणार आहेत. शिवसेना फुटीला ठाकरे यांच्याप्रमाणेच राष्ट्रवादीचे अजित पवार हेही तितकेच जबाबदार आहेत. असा आरोप ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी केला. ठाकरे यांच्यासोबत भविष्यात सकाळच्या भोंग्याशिवाय कोणीही नसेल, अशी टीका त्यांनी केली.

ना. महाजन रविवारी (दि.18) नाशिक दौर्‍यावर असताना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पालकमंत्री दादा भुसे यांनी जिल्हा नियोजन निधी वितरणात दुजाभाव केल्याचा आरोप राष्ट्रवादी व काँग्रेसच्या आमदारांनी केल्याबद्दल ना. महाजन यांना विचारण्यात आले. महाजन यांनी त्यावर प्रतिक्रिया देताना आरोप करणार्‍यांनी मागच्या काळात काय झाले हे आधी तपासावे. शिवसेनेचा मोठा गट भाजपकडे येण्यामागे उद्धव ठाकरे यांच्याप्रमाणे राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांचाही हात आहे. मविआच्या काळात पवार यांनी अर्थमंत्री म्हणून निधी वाटपात राष्ट्रवादीच्या आमदारांना झुकते माप दिले. सेना व काँग्रेस आमदारांना निधी देण्यात त्यांनी आखडता हात घेतल्याचे सांगत कोणाला किती निधी वाटप केला याचे कागद दाखवू का? असे आव्हान महाजन यांनी पवार यांना दिले. नियमानुसार निधी वाटप व कामांना मान्यता दिली गेली असेल, असे सांगत ना. भुसे यांची त्यांनी पाठराखण केली. वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी औरंगजेबच्या कबरीला भेट दिल्याबद्दल ना. महाजन यांचे लक्ष वेधण्यात आले असता औरंगजेबाचे उदात्तीकरण कदापि स्वीकारले जाणार नाही. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना तिलांजली देत चार वर्षांपूर्वी काँग्रेस व राष्ट्रवादीच्या मांडीवर जाऊन बसणारे उद्धव ठाकरे आता आंबेडकर यांच्यासोबत मांडीला-मांडी लावून बसताहेत. त्यामुळे ठाकरे यांनी औरंगजेबाचे उदात्तीकरण करणार्‍यांबद्दल भूमिका स्पष्ट करावी, असे खुले आव्हान दिले.

तक्रार करावी : जलजीवन मिशनच्या कामांबद्दलच्या तक्रारीनंतर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी प्रशासनाला नियंत्रण ठेवण्याचे आदेश दिले आहेत. कामांमध्ये कोठेही गैरकारभार झाला असल्यास तक्रार करावी. त्याची चौकशी करून कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांवर बोलताना नुसते आरोप नको, पुरावे द्या, तक्रार करावी, असे मत त्यांनी व्यक्त केले.

तर कारवाई होणार
राज्यात बोगस बियाणे विक्री करणार्‍या व्यापार्‍यांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा ना. महाजन यांनी दिला आहे. शेतकर्‍यांनी सजग राहत असे प्रकार घडत असल्यास निदर्शनास आणून द्यावे, अशा सूचना केल्या. तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या महाराष्ट्रातील दौर्‍यावर टीका करताना पैशांचे आमिष दाखवून मते मिळत नाही, असे महाजन म्हणाले.

हेही वाचा:

The post नाशिक : शिवसेना फुटीला अजित पवारही तेवढेच जबाबदार - गरीश महाजन appeared first on पुढारी.