Nashik : अंदरसूलच्या शेतकऱ्याकडून शाश्वत शेतीचा प्रयोग, ३६ गुंठ्यांत लावली…

शाश्वत शेती प्रयोग,www.pudhari.news

नाशिक : वैभव कातकाडे

शेती करताना नावीन्याचा विचार डोक्यात असेल तर ती शेती फक्त शेती राहत नाही तर समाजासाठी आदर्श निर्माण करते. येवला तालुक्यातील अंदरसूल या गावातील हरिभाऊ सोनवणे यांनी आपल्या शेतातील ३६ गुंठ्यांमध्ये विविध प्रकारचे हायडेन्सिटी पिके उभारत नैसर्गिक ऑक्सिजन प्लांट तयार केला आहे.

सोनवणे यांनी तयार केलेल्या या शाश्वत शेतीमध्ये एकूण ३ हजार विविध वृक्ष आहेत. यामध्ये २ हजार सदाबहार पेरू (बाराही महिने चालणारा पेरू), ३०० बांबू यासोबतच अंजिर, सफेद जांभूळ, सीडलेस लिंबू, ड्रॅगन फ्रूट, काजू, हिरडा, बेहडा, ॲनाकोडा, मोहगणी, फणस, आवळा, नारळ अशा अनेक फळपिकांचा समावेश आहे. त्यासोबतच पालेभाज्यांमध्ये गवार, डांगर, मेथी, शेवगा, शेपू, पालक यांचा समावेश आहे. कमी क्षेत्रात जास्त झाडांचे रोपण करून जास्तीत जास्त उत्पन्न घेण्यावर सोनवणे यांचा भर आहे. शाश्वत उत्पन्न देणारा हा प्रयोग अत्यंत धाडसाने त्यांनी साकारला आहे.

यासाठी गेली आठ-दहा महिने राज्यातील विविध भागांत शेतकऱ्यांनी केलेली शाश्वत शेती बघून त्यावर अभ्यास करून ठराविक ३६ गुंठ्यांत हायडेन्सिटी शेतीचा प्रयोग करण्याचे त्यांनी ठरविले आणि प्रत्यक्षात आणले आहे. सोनवणे यांच्या शेतात असलेल्या पिकांना एकही रासायनिक खत वापरले जात नाही. शहरात वाढत्या आजाराचे मूळ कारण म्हणजे सेंद्रिय भाजीपाला पिके यांचा अभाव होय. हाच धागा पकडत सोनवणे यांनी आपल्या शेतात एकाही रासायनिक खताला थारा दिला नाही. झाडांचे पोषण व्हावे आणि ते ही योग्य पद्धतीने व्हावे, यासाठी जीवामृत तयार करणारा 6 हजार लिटर क्षमतेचा एन एरेबेटिक फुगा आपल्या शेतात बसविला आहे.

ठिबकच्या माध्यमातून शेतातील प्रत्येक झाडाला जसे पाणी पोहोचते तसेच हे जीवामृतदेखील पोहोचते. त्यामुळे मृदाक्षय न होता तेदेखील सांभाळले जाते. जीवामृत असल्याने इतर कोणत्याही खतांची गरज भासत नाही. हा आधुनिक प्रयोग जाणून घ्यायला कृषी विभाग, आत्मा तसेच आधुनिक विचारसरणीचे शेतकरी येथे भेटी देत आहे. 

The post Nashik : अंदरसूलच्या शेतकऱ्याकडून शाश्वत शेतीचा प्रयोग, ३६ गुंठ्यांत लावली... appeared first on पुढारी.