नाशिक : शिवसेनेचा मनपा प्रभाग कार्यालयात राडा

Shivsena www.pudhari.news

नाशिक (मालेगाव)   : पुढारी वृत्तसेवा
अंदाजपत्रकात शहराच्या पश्चिम भागातील विकासकामांसाठी निधीची तरतूद न झाल्याच्या मुद्द्यावरून बाळासाहेबांची शिवसेना गटाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मंगळवारी (दि.15) मनपाच्या प्रभाग एक कार्यालयात हल्लाबोल केला. काही कार्यकर्त्यांनी सभापती कार्यालयातील टेबल, खुर्च्यांची फेकाफेक व तोडफोड केल्याने एकच गोंधळ उडाला होता.

मालेगाव महापालिकेच्या सन2022-23 या आर्थिक वर्षाच्या अंदाजपत्रकातून प्रभाग एक कार्यक्षेत्रातील विकासकामांसाठी निधीची तरतूद नसल्याने नागरिकांना मूलभूत सोयी-सुविधांपासून वंचित राहावे लागत असल्याच्या निषेधार्थ माजी उपमहापौर नीलेश आहेर यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी शिवसेना संपर्क कार्यालयापासून प्रभाग एकवर मोर्चा नेण्यात आला. प्रभाग कार्यालयाला टाळे ठोकण्यात आले. गत वर्षाच्या अंदाजपत्रकातून शहराच्या पश्चिम भागात कोणतेही विकासकाम झाले नाही. सर्वाधिक कर भरणार्‍या भागावरच हा अन्याय झाला असल्याचा यावेळी आरोप करण्यात आला. प्रभाग कार्यक्षेत्रात कोणत्याही प्रकारची स्वच्छता होत नाही तसेच या भागात फवारणीदेखील होत नसल्याने डास व मच्छरांचा प्रादुर्भाव वाढला आहे. नागरी आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असल्याचा रोष यावेळी व्यक्त केला गेला. त्यानंतर काही कार्यकर्त्यांनी थेट कार्यालयात धडक देत प्रभाग सभापती कार्यालयातील टेबल, खुर्च्या फेकल्या. सूचना फलकाची काच तोडण्यात आली. या अनपेक्षित प्रकारामुळे एकच गोंधळ उडाला. प्रभाग क्रमांक 1 मधील सर्व प्रभागांमध्ये या आर्थिक वर्षाच्या अंदाजपत्रकामध्ये विकासकामांची तरतूद करून तत्काळ निविदा प्रक्रिया राबवावी, अन्यथा भविष्यात मोठे आंदोलन केले जाईल, असा निवेदनात्मक इशारा यावेळी देण्यात आला. उपआयुक्त गणेश गिरी, उपआयुक्त सुहास जगताप व लेखाधिकारी राजू खैरनार यांनी निवेदन स्वीकारले. उपआयुक्त गिरी यांनी येत्या आठ दिवसांत सर्व कामांची निविदा प्रक्रिया पूर्ण करू, असे आश्वासन दिले. याप्रसंगी माजी महापौर सखाराम घोडके, माजी नगरसेवक राजेश गंगावणे, युवा सेनेचे जिल्हाप्रमुख विनोद वाघ, विधानसभा सहसंपर्क प्रमुख प्रमोद पाटील, माजी नगरसेवक नीलेश काकडे, राजेश अलीझाड, ताराचंद बच्छाव, जयराज बच्छाव, यशपाल बागूल, किरण पाटील, बाळकृष्ण तिसगे, प्रकाश आहिरे, किशोर बच्छाव, शरद पाटील, संभाजी आहिरे, सचिन पठाडे, संदीप पवार, दिनेश गवळी, संतोष शिंदे, संदीप कासार, तुषार मोरे, शरद बच्छाव, सोमनाथ खैरनार, पिंटू आहिरे, बिपीन रायते आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

सत्ताधारीच बनले आंदोलक…
सत्तेतून पायउतार झालेल्या काँग्रेसने शहरात होऊ घातलेल्या 100 कोटींच्या कामांमध्ये दुजाभाव होत असल्याचा आरोप केल्याला काही दिवस उलटत नाही तोच याच युतीतील घटकपक्ष शिवसेनेनेही या मुद्द्यावर प्रभाग कार्यालयात हंगामा केला. तत्कालीन काँग्रेसचे महापौर शेख रशीद हे मंत्री दादा भुसे व प्रशासक भालचंद्र गोसावी यांच्यावर सापत्न वागणुकीचा आरोप करत आहेत. तर, मंगळवारी शिवसेनेने निधी देण्यात दुजाभाव होत असल्याचा रोष व्यक्त केल्याने नेमका अन्याय कुणावर आणि कोण करतंय, असा सवाल सोशल मीडियावर उपस्थित होत आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : शिवसेनेचा मनपा प्रभाग कार्यालयात राडा appeared first on पुढारी.