लोकशाहीर केरू घेगडे यांचे कारसूळला हवे स्मारक

स्मारक www.pudhari.news

निमित्त : जिजा दवंडे

कारसूळ (ता. निफाड) येथील मूळ रहिवासी असलेले लोककवी, स्वातंत्र्यसैनिक, लोककलावंत, लोकशाहीर व आंबेडकरी जलशाचे जनक केरू अर्जुना घेगडे यांच्या कार्याची दखल घेऊन ते कारसूळ येथील मूळ रहिवासी असल्याबाबतची नोंद शासन राजपत्रात घ्यावी. त्यांचा मरणोत्तर सन्मान सोहळा करून स्मारक उभारण्यासाठी जनतेचा रेटा वाढू लागला आहे, कारसूळ ग्रामपंचायतीच्या वतीने याबाबत ठराव करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना गळ घातली आहे.

कारसूळ येथील मूळ रहिवासी केरू अर्जुना घेगडे हे लोककवी, लोककलावंत, लोकशाहीर व आंबेडकरी जलशाचे जनक असलेले महान अष्टपैलू व्यक्तिमत्त्व आहेत. त्याची दखल घेऊन शासनाने त्यांचा सन्मान सोहळा करावा. तसेच त्यांचे स्मारक कारसूळ येथे उभारून व त्यांचा जीवनपट शालेय स्तरावर पाठ्यपुस्तकांत समाविष्ट करण्यासाठी ग्रामपंचायत तसेच लोककलाकारांच्या संघटना पुढे आल्या आहेत. सामाजिक कार्यकर्ते व कारसूळचे ग्रामपंचायत सदस्य देवेंद्र काजळे यांनी याबाबत पाठपुरवठा करत अनेक संदर्भ शोधून काढत त्याचा संच सांस्कृतिक विभाग आणि मुख्यमंत्र्यांना पाठविला आहे. केरू अर्जुना घेगडे यांचा जन्म दलित समाजातील गरीब कुटुंबात कारसूळ (ता. निफाड) येथे 13 मे 1912 रोजी झाला. आईचे नाव ठकूबाई अर्जुना घेगडे व पत्नीचे नाव रेशमी होते. त्यांचे चौथीपर्यंत शिक्षण कारसूळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत झाले. पाचवीचा वर्ग नसल्याने ते परगावी शिक्षणास गेल्याचे शाळेच्या दाखल्यावरून समजते. 14 वर्षांचे असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले. आई गावात गोधडी शिवणकाम करीत असताना आईला मिठी मारून ते जेवण मागत. डॉ. आंबेडकरांचा सहवास देश पारतंत्र्यात असताना आपला देश स्वतंत्र झाला पाहिजे, यासाठी या शाहिराने नेहमीच आपल्या लिखाणातून व वाणीतून जनजागृती केली. केरू घेगडे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासमवेत सत्याग्रह, चळवळ, आंदोलने यात भाग घेऊन, वेळप्रसंगी ठिकठिकाणी जलसे सादर करून जनजागृती केली. या शाहिराने मुंबईच्या नरे पार्कवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मदिनी बॅरिस्टर जिना यांच्यासमोर त्यांनी लिहिलेले कवण पहाडी आवाजात सादर केले होते. या शाहिराचा ‘महाराचं प्वार बिट्या लय हुशयार!!, बिट्या लय हुशयार…, अरं बघ, बघ, बघ’ हा पोवाडा आजही मोठ्या प्रमाणात गाजत आहे. ज्येष्ठ साहित्यिक नरेंद्र जाधव यांच्या साहित्यात लोकशाहीर केरू घेगडे यांच्या शाहिरीची माहिती लोकशाहीर गणेश चंदनशिवे यांनीही या गीताला आवाज देऊन घेगडे यांच्या आठवणी जिवंत ठेवल्या आहेत.

हेही वाचा:

The post लोकशाहीर केरू घेगडे यांचे कारसूळला हवे स्मारक appeared first on पुढारी.