नाशिक : शेतकरी विरोधात धोरणे आखणाऱ्या भाजपला बाजुला ठेवा – राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार

गिरणारे www.pudhari.news

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा
केंद्र सरकारचा शेतकऱ्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे, त्यांचा निर्यात ऐवजी आयातीच्या धोरणाला पाठींबा अधिक दिसतो, यामुळे शेतकरी वर्ग आर्थिक अडचणीत येत असून भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारला बाजुला ठेवा ,असे आवाहन राष्ट्रवादी काँगेस पार्टीचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांनी केले.

देवळाली विधानसभा मतदार संघातील देवरगाव येथे रविवारी ( दि. ९ ) शासकीय आदिवासी आश्रम शाळा इमारत बांधकाम भूमिपूजन सोहळा खासदार शरद पवार यांच्या हस्ते पार पडला. त्यावेळी खासदार शरद पवार बोलत होते. व्यासपीठावर नाशिक जिल्ह्याचे माजी पालकमंत्री छगन भुजबळ , विधानसभेचे उपाध्यक्ष नरेन्द्र झिरवळ , आमदार सरोज अहिरे, आमदार माणिकराव कोकाटे, माजी खासदार देविदास पिंगळे, माविप्र सरचिटणीस नितीन ठाकरे, मविप्र अध्यक्ष डॉ.सुनील ढिकले, माजी खासदार समीर भुजबळ, सचिन पिंगळे,नाना महाले, प्रेरणा बलकवडे, विष्णुपंत म्हैसधूने, नाशिकरोड देवळाली व्यापारी बँकेचे अध्यक्ष निवृत्ती अरींगळे , माजी जिल्हा परिषद सदस्य संजय तुंगार, माजी नगरसेवक जगदीश पवार,नाशिक तालुका राष्ट्रवादी युवक अध्यक्ष गणेश गायधनी आदी उपस्थित होते. खासदार शरद पवार पुढे म्हणाले की, आमदार सरोज आहेर यांनी नाशिक कारखाना सुरू करावा, यासाठी आपल्याकडे अनेकवेळा पाठपुरावा केला, तज्ञ पाठवून आपण कारखान्याच्या मशनरीच्या क्षमतेची तपासणी करुन घेतली, आश्रम शाळेसाठी निधी मिळवत त्यांनी आदिवासी समाजाच्या विद्यार्थ्याच्या शैक्षणिक सुविधांसाठी प्रामाणिक प्रयत्न केले , असे गौरवोद्गार काढून आमदार सरोज अहिरे यांच्या पाठीमागे मतदार संघातील नागरिकांनी भक्कमपणे उभे रहावे ,असे खासदार शरद पवार यांनी आवाहन केले. नाशिक जिल्ह्याचे माजी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी आदिवासी समाजाकडे अधिक लक्ष द्यायला हवे, स्वातंत्र्य मिळविण्यात त्यांचे देखील योगदान आहे, आदिवासी समाजाच्या शिक्षणाकडे लक्ष द्यायला हवे, तसे झाले तर आदिवासी समाज इतरांच्या बरोबरीत येऊन प्रगती साधु शकतो, असे भुजबळ यांनी म्हटले. विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी आपल्या भाषणात शरद पवार यांनी आदिवासी समाजाच्या विकासासाठी स्वतंत्र आदिवासी विभाग निर्माण केला. तसेच बजेटच्या नऊ टक्के निधी आदिवासी विकासासाठी राखून ठेवला, त्यामुळे महाराष्ट्रात आज सुमारे साडेपाचशे आश्रम शाळा निर्माण झाल्याचे दिसते. आदिवासी समाजाचे अधिकारी आज तुम्हाला मंत्रालय तसेच विविध शासकिय, निमशासकीय विभागात काम करतांना दिसतात त्यामागे शरद पवार यांचे दूरदृष्टीचे धोरण कारणीभूत ठरले असे झिरवळ यांनी सांगितले. प्रास्ताविक भाषणात बोलतांना आमदार सरोज अहिरे म्हणाल्या की, अडीच वर्षात तुम्ही निर्माण केलेल्या महाविकास आघाडीच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांचा निधी विविध विकास योजनांसाठी अजित दादा पवार यांनी मंजुर करुन दिला, त्यात देवरगावच्या आश्रम शाळेच्या इमारत बांधकामाचा १९ कोटींच्या निधीचा समावेश आहे. त्याचप्रमाणे बालाजी देवस्थान, नाशिक सहकारी साखर कारखाना या महत्वाच्या समस्या महाविकास आघाडीच्या काळात कायमच्या मार्गी लागलेल्या आहेत, एकलहरा औष्णिक वीज केंद्राचा प्रलंबित ६६० मेगाव्हॉट प्रकल्प सोडविण्यासाठी आपण मध्यस्थी करावी,असे आवाहन आमदार सरोज अहिरे यांनी खासदार शरद पवार यांना करून मतदार संघातील विकासकामांची माहिती उपस्थितांना दिली.कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सिमा पेठेकर यांनी केले.आभार कचरू पाटील तांभेरे यांनी मानले .

भावनेचे राजकरण होतेय 
मिरवणूकीत वादविवाद निर्माण करुन हिंदु – मुस्लिम तणाव निर्माण करून भावनेचे राजकरण केले जातेय, पण त्यामुळे विकास खुंटतोय, हे लक्ष्यात ठेवायला हवे. अशी टीका भुजबळ यांनी भाजपवर केली.

सर्व मार्केट कमिटी ताब्यात घ्या 
आपले कामे करायच्या असेल तर सर्व ठिकाणी आपली माणसे असायला हवेत, जिल्हयात होऊ घातलेल्या सर्व मार्केट कमिटी निवडणूकीत एकजूट दाखवा, सर्व ठिकाणी सत्ता मिळावत ताब्यात घ्या, पुढे विधानसभा देखील ताब्यात घेऊ, फक्त गटबाजी, हेवे दावे करु नका, असे आवाहन भुजबळ यांनी केले.

हेही वाचा:

The post नाशिक : शेतकरी विरोधात धोरणे आखणाऱ्या भाजपला बाजुला ठेवा - राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार appeared first on पुढारी.