बाळासाहेबांची शपथ घेऊन सांगतो, तो व्हिडीओ..

संजय राऊत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा– भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा मकाऊतील कॅसिनोमधील व्हिडिओ लिक झाल्यानंतर सुधाकर बडगुजर यांच्यावर कारवाई केली गेली. पण, ही वस्तुस्थिती नाही. बाळासाहेब ठाकरे माझे दैवत आहेत. त्यांची शपथ घेऊन सांगतो की, त्या व्हिडिओचा बडगुजर आणि त्यांच्या कुटुंबीयांचा काहीही संबंध नाही. संघ परिवार, विशेषत: नागपूरवाल्यांना व्हिडिओ कसा लिक झाला हे माहिती आहे, असा गौप्यस्फोट शिवसेना शिंदे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला. यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि व्यंकटेश मोरे यांचे फोटोही माध्यमांसमोर जाहीर करीत, ती पार्टी भाजप पदाधिकारी मोरे यांनीच आयोजित केल्याचेही राऊत म्हणाले.

शिवसेना ठाकरे गटातर्फे २३ जानेवारी रोजी आयोजित महाशिबिराच्या नियोजनाचा आढावा घेण्यासाठी राऊत नाशिकमध्ये आले असता, माध्यमांशी बोलताना त्यांनी भाजपवर निशाणा साधला. राऊत म्हणाले, ‘दहशतवादी सलीम कुत्तासोबत सुधाकर बडगुजर यांचा डान्स करतानाचा व्हिडिओ समोर आल्यानंतर त्यांच्यावर कारवाई केली जात आहे. वास्ताविक ती पार्टी भाजप पदाधिकारी व्यंकटेश मोरे यांनी आयोजित केली होती. मोरेंनीच बडगुजरांना आमंत्रण दिले होते. मात्र, या पार्टीत सहभागी ‘कुत्ता’ला पॅरोल कोणी दिला?, त्यावेळी गृहमंत्री कोण होते?, बॉम्बस्फोटातील तो भयंकर गुन्हेगार होता, तर त्याला तुरुंगातून कोणी सही करून सोडले? याचा तपास भाजपने करावा अन् नंतरच आमच्याकडे बोट दाखवावे. आजही व्यंकटेश मोरे नाशिकमध्ये भाजपचा पदाधिकारी आहे. त्याने सर्वपक्षीयांसाठी पार्टी आयोजित केली असेल तर पार्टीला जाणे, बसणे, चर्चा करणे ही आपली परंपरा आहे. भाजपमधील सलीम कुत्ताच्या सहकाऱ्यांकडून जे प्रश्न विचारले जात आहेत, आधी त्यांनी स्वत:कडे बघावे, असे म्हणत भाजप आमदार नितेश राणे यांनाही राऊतांनी टोला लगावला.

दरम्यान, याप्रसंगी सुधाकर बडगुजर यांच्यासह जिल्हाप्रमुख विजय करंजकर, उपनेते सुनील बागूल, माजी आमदार योगेश घोलप, माजी महापौर विनायक पांडे, विलास शिंदे आदी उपस्थित होते.

पवारांनी कौतुक केले तर काय चुकले?

शरद पवार यांच्या बारामतीतील विद्या प्रतिष्ठान संस्थेला उद्योगपती गौतम अदानी यांनी २५ कोटी रुपयांची देणगी दिल्याने शरद पवार यांनी अदानींचे जाहीर कौतुक केले. याबद्दल विचारले असता त्यात चुकीचे काय ? अशा अनेक संस्थांना देणग्या उद्योगपती देत असतात, अशी प्रतिक्रिया राऊत यांनी दिली. आम्ही पण धारावीचा मोर्चा काढला होता, तो प्रोजेक्ट मुंबईच्या भविष्यासाठी योग्य नाही, अशी आमची भूमिका आहे. पवार साहेबांच्या संस्थांना देणगी दिली तर आक्षेप घेण्याचे कारण नाही, पीएम केअरला पण दिलीच होती असे राऊत म्हणाले.

मुख्यमंत्री घाबरतात

२०२४ मध्ये कोणती घाण साफ होते आणि कोण कचऱ्याच्या डब्यात जाणार हे कळेल, असे म्हणत संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही टीका केली. आदित्य ठाकरे कार्यक्षम आमदार आहेत. आदित्य ठाकरेंना राज्याचे मुख्यमंत्री किती घाबरतात हे आपण बघितले आहेच.

जरांगेंवर उपोषणाची वेळ येऊ नये

जरांगेंवर उपोषणाची वेळ येऊ नये, उपोषणामुळे त्यांच्या प्रकृतीवर परिणाम होतोय, नाजूक आहेत. त्यांनी मुंबईत उपोषण केले तर महाराष्ट्रावर ताण पडेल. एक समाज संघर्ष करतोय, जरांगे नेतृत्व करतायत तर सरकारने पाऊल टाकावे, असेही राऊत म्हणाले.

हेही वाचा :

The post बाळासाहेबांची शपथ घेऊन सांगतो, तो व्हिडीओ.. appeared first on पुढारी.