शबरी घरकुल योजनेची माहिती हवी आहे, मंत्री गावितांनी घेतली कर्मचाऱ्याची परीक्षा

डॉ. विजयकुमार गावित

नंदुरबार : मुंबई मंत्रालयातील आपल्या दालनातून राज्याचे आदिवासी विकासमंत्री तथा नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित हे आपल्याच विभागाने सुरू केलेला टोल फ्री हेल्पलाइन नंबरवर स्वतःच डायल करतात. आपण कोण बोलतोय हे न सांगता शबरी घरकुल योजनेबाबत माहिती हवी आहे. याची माहिती मिळेल का? असे बोलून हेल्पलाइनवर बसलेल्या आपल्याच एका कर्मचाऱ्याची परीक्षा घेतात. तर समोरून अत्यंत नम्रपणे विनयशील स्वरात विचारणा केली जाते आणि ठक्कर बाप्पा घरकुल योजनेची सविस्तरपणे माहिती दिली जाते.

मंत्री डॉ. गावित यांनीच काही दिवसांपूर्वी या हेल्पलाइनचे उद्घाटन नाशिक येथे कार्यक्रमात केले होते. पण तो क्रमांक खरोखरीच कसा चालतो याची माहिती त्यांना प्रत्यक्ष घ्यायची होती. म्हणून त्यांनी मंत्रालयातून एक फोन कॉल सेंटरला लावला. मंत्री आपले नाव न सांगता, एका स्वीय सहायकाचे नाव आणि पत्ता सांगतात. योजनेची सारी माहिती पलीकडून पटापट दिली जाते.

एरवी कॉल सेंटरचे फोन हे ग्राहकांची परीक्षा घेणारे असतात. आधी मराठी हवे की इंग्रजी हवे यासाठी एक नंबर डायल करा, नंतर कोणत्या विषयाची माहिती हवी त्यासाठी विविध नंबर डायल करा आणि अशा प्रकारे पंधरा-वीस मिनिटे गेल्यानंतर योग्य माहिती ग्राहकांपर्यंत पोहोचते. पण इथे प्रत्यक्षात योग्य माहिती देणारी ऑपरेटर महिला कर्मचारी माहिती द्यायला सुरुवात करते. आपण कोणाशी बोलत आहोत याची पुसटशीही कल्पना हेल्पलाइनवर माहिती देणाऱ्या संबंधित कर्मचाऱ्याला नव्हती. हा अनुभव म्हणजे मंत्री डॉ. विजयकुमार गावित तसेच मंत्री दालनात बसलेल्या अधिकाऱ्यांना, अभ्यागतांना सुखद धक्का होता.

18002670007 हा आदिवासी विकास विभागाच्या हेल्पलाइनचा नंबर नव्याने सुरू केला आहे. या हेल्पलाइनचा कंट्रोल रूम नाशिक आदिवासी विकास आयुक्तालय, नाशिक येथे राहणार आहे. आदिवासी विभागाच्या योजना आणि या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्याला कोणत्या कागदपत्रांची पूर्तता करायची आहे याची सविस्तर माहिती या क्रमांकावर मिळते.

आदिवासी विकासमंत्री डॉ. विजयकुमार गावित म्हणाले की, या विभागाची सारी कामे मागे पडली होती. गेल्या वर्षभरात आम्ही मोठ्या प्रमाणात कामाला सुरुवात केली असून, सध्या शासन आपल्या दारी मोहिमेच्या माध्यमातून विविध योजनांचा लाभ थेट लाभाथ्र्यापर्यंत पोहोचवला जात आहे.

हेही वाचा : 

The post शबरी घरकुल योजनेची माहिती हवी आहे, मंत्री गावितांनी घेतली कर्मचाऱ्याची परीक्षा appeared first on पुढारी.