नाशिक :सप्तशृंगी देवी मंदिर प्रवेशद्वारजवळ शेंदूर स्तंभ उभारणार असल्याने संभाव्य चेंगराचेगरी होण्याची शक्यता व्यक्त

सप्तशृंगगड www.pudhari.news

नाशिक (सप्तशृंगगड) : पुढारी वृत्तसेवा

लाखो भाविकांचे श्रद्धास्थान पर्यटनस्थळ व उत्तर महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या श्रीक्षेत्र सप्तशृंगी गडावर सप्तशृंगी देवीची मूर्ती संवर्धन प्रक्रिया केल्यानंतर भगवतीच्या स्वरूपावरील मागील कित्येक वर्षापासून साचलेला शेंदूर लेपणाचा भाग कवच हा धार्मिक व शास्त्रोक्त पद्धतीने 1800 किलो शेंदूर पण काढण्यात आला आहे. हा शेंदूर पहिला पायरीच्या प्रवेशद्वाराजवळ कमानीमध्ये मध्यभागी स्तंभ उभा करून येणाऱ्या भाविकांना दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. स्तंभ उभा केल्यामुळे या जागी अडचण निर्माण होऊन संभाव्य दुर्घटना होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. गडावर वर्षभरातून दोन वेळेस यात्रा भरत असताना चैत्रोत्सव, नवरात्र उत्सव या दरम्यान लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात. पहिल्या पायरीला भाविक महिषासुरमर्दीनीच्या चरणी नतमस्तक होऊन याच मार्गाने दर्शनाला जात असतात. या ठिकाणी यात्रा उत्सव काळात भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने दोन ते तीन ठिकाणी या परिसरातच मेटल डिटेक्टर उभे केले जातात. त्यामुळे जागा अपुरी पडते. त्यातच स्तंभ मध्यभागी उभा केल्याने जागेची अडचण निर्माण होऊन भविष्यात चेंगराचेंगरीची मोठी दुर्घटना होऊ शकते असा भाविकांनी संशय व्यक्त केला असून हे काम त्वरित बंद करण्याची मागणी भाविकांकडून केली जात आहे

शेंदूर सतंभ उभारण्याबाबत विश्वस्त मंडळांनी ग्रामपंचायतीस कोणतीही कल्पना दिलेली नाही. तसेच ग्रामस्थ व व्यवसायिकांना कुठल्याही प्रकारे माहिती न देता व विश्वासात न घेता परस्पर काम सुरु केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. आपत्ती व्यवस्थापन कायदा अंतर्गत कुठल्याही अधिकाऱ्यांचा याबाबत सल्ला किंवा चर्चा न  केल्याने याबाबत आश्चर्य व्यक्त होत असून स्तंभ मध्यभागी न घेता दिप माळेच्या बाजूला बसविण्यात यावा. जेणेकरून या भागात भविष्यात अडचण निर्माण होऊन चेंगराचेंगरी होणार नाही तसेच भाविकांना सुरळीत दर्शन व्हावे, या हेतूने कमान बांधण्यात आली आहे.

याबाबत जिल्हा अधिकाऱ्यांनी लक्ष घालावे तसेच विश्वस्तांनी मनमानी कारभार थांबवावा अशी मागणी भाविकांकडून केली जात आहे. मंदिरातील कामे करताना किवा भाविकभक्त सेवा पुरविणे हे ट्रस्टचे कर्तव्य आहे. शेंदुररचीत स्तंभ इतर ठिकाणी उभारणी करणे गरजेचे आहे. एकीकडे पहिल्या पायरीवर महिषासुरमर्दीनीचे दर्शन करणार की शेंदुररचीत स्तंभाचे दर्शन घेणार असा प्रश्न निर्माण होवून रांगेत उभे राहणाऱ्यांचे हाल होतील. स्तंभ उभारणात भाविष्याचा विचार करून निर्णय घ्यावा, असे भाविकांसह ग्रामस्थांकडून मागणी होत आहे.

सप्तशृंगी देवीच्या प्रवेशद्वाराजवळ मध्यभागी शेंदूरचा स्तंभ उभारणार येत आहे. त्यामुळे याठिकाणी गर्दी होवून अडचण निर्माण होऊ शकते. स्तंभ उभारण्यास विरोध नाही परंतु हा स्तंभ इतर ठिकाणी उभा करावा. भाविष्याचा विचार करून निर्णय घ्यावा याबाबत ग्रामपंचायत मार्फत पञ देऊन  ट्रस्टचेसोबत चर्चा करणार आहे. – रमेश पवार, सरपंच सप्तशृंगगड.

हेही वाचा:

The post नाशिक :सप्तशृंगी देवी मंदिर प्रवेशद्वारजवळ शेंदूर स्तंभ उभारणार असल्याने संभाव्य चेंगराचेगरी होण्याची शक्यता व्यक्त appeared first on पुढारी.