नाशिक : सलग दुसऱ्या दिवशीही विनाहेल्मेट दुचाकीस्वारांना पोलिसांचा दणका

हेल्मेटसक्ती नाशिक,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

विनाहेल्मेटमुळे मृत्यूचे प्रमाण रोखण्यासाठी पोलिस आयुक्तांच्या आदेशानुसार गुरूवार (दि.१) पासून शहरात हेल्मेटसक्ती मोहिम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत बेशिस्त वाहनचालकांविरोधात केली जात आहे. सलग दुसऱ्या दिवशी अर्थात शुक्रवारी (दि.२) शहरातील ठराविक ठिकाणी नाकेबंदी करत विनाहेल्मेट दुचाकीचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. नाकेबंदी बघून विना हेल्मेट दुचाकीस्वार विरूध्द मार्गाने माघारी फिरल्याने किरकोळ अपघाताच्या घटनाही घडल्या.

शहरासह उपनगरांमध्ये विनाहेल्मेट दुचाकीचालकांचे अपघाती मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यापार्श्वभूमीवर दुचाकीस्वाराने वाहन चालविताना हेल्मेट वापरावे, या हेतूने नाशिक पोलिस आयुक्तालयाकडून गेल्या वर्षभरापासून विविध प्रकारची कारवाई करण्यात येत आहे. हेल्मेटसक्ती माेहिमेअंतर्गत ठराविक ठिकाणे निश्चित करून विना हेल्मेट दुचाकीस्वारांवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. त्यामुळे दुचाकीधारक चांगलेच धास्तावले आहेत.

दरम्यान, शहरातील वाहतुकीला शिस्त लागावी आणि अपघातांमध्ये घट होण्यासाठी पोलीस आयुक्तालयाकडून हेल्मेटसक्तीची अधिसूचना काढण्यात आली आहे. शहरातील वेगवेगळ्या परिसरात दररोज कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे दुचाकीस्वारांसह नाशिककरांनी वाहतूक नियमांचे पालन करावे, दुचाकी चालवितांना हेल्मेट वापरण्याचे आवाहन शहर वाहतूक पोलीस विभागाकडून करण्यात आले आहे.

सुमारे ५ लाखांचा दंड वसूल

नाशिक पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत शुक्रवारी (दि.२) तारवाला सिग्नल, राज स्वीट, सिटी सेंटर मॉल, बाफना ज्वेलस, खुटवड नगर, माऊली लॉन्स, विहितगाव, भैरवनाथ मंदिर आदी ठिकाणी नाकेबंदी करत विना हेल्मेटधारक दुचाकीस्वाराविरोधात कारवाई करण्यात आली. दिवसभरात पाचशे वाहनचालकांविरोधात दंडात्मक कारवाई करत पोलिसांनी त्यांच्याकडून सुमारे ५ लाखांचा दंड वसूल करण्यात आला.

हेही वाचा :

The post नाशिक : सलग दुसऱ्या दिवशीही विनाहेल्मेट दुचाकीस्वारांना पोलिसांचा दणका appeared first on पुढारी.