नाशिक : साकी तालुक्यात बोगस डॉक्टरांचा पर्दाफाश; विना परवाना उपचार केल्याप्रकरणी कारवाई

पिंपळनेर; पुढारी वृत्तसेवा : कोणताही परवाना व वैद्यकीय शिक्षण नसतांना साक्री तालुक्यात आपली दुकाने थाटल्याने उपचार नागरिकांच्या जिवावर बेतत आहेत. याबाबत नागरिकांच्या तक्रारी वाढू लागल्यानंतर शनिवारी (दि. २१) साक्री तालुक्यातील माळमाथा येथे धडक कारवाई करण्यात आली. छडवेल येथील दोन तर चिपलीपाडा येथील एक अशा तीन बोगस डॉक्टरांविरुध्द निजामपूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. या कारवाईमुळे बोगस डॉक्टरांचे धाबे दणाणले आहेत.

साक्री तालुक्यातील छडवेल व निजामपूर येथील बोगस डॉक्टरांबाबतही अनेक तक्रारी प्राप्त होत होत्या. त्यामुळे जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी सचिन बोडके यांनी कारवाई करण्याचे आदेश दिले,त्यानुसार छडवेल येथील वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.राहुल पवार यांनी तक्रारींची पडताळणी करण्याची संबंधित डॉक्टरांकडे तपासणी केली. यावेळी त्यांना छडवेल गावातील कृष्णा किरण समजदार व संजय लक्ष्मीचंद आहुजा (वय ५१) हे दोघेजण घरातून वैद्यकीय व्यवसाय करताना आढळून आले तर चिपलीपाडा येथे संतू बाबू बैरागी (वय ३०) हे देखील वैद्यकीय व्यवसाय करताना आढळून आले. या तिघा डॉक्टरांना वैद्यकीय डिग्रीची विचारणा केली असताना त्यांनी डिग्री दाखवण्यास टाळाटाळ केली. सदर डॉक्टर बोगस असल्याची खात्री पटल्याने वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. राहुल पवार यांच्या फिर्यादीवरुन निजामपूर पोलिसात महाराष्ट्र वैद्यकीय अधिनियम 1965 चे कलम 33 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.पोलिस अधिक्षक हनुमंत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली म.पो.गांगुडेॅ,सुनील अहिरे तपास करीत आहेत.

आदिवासी ग्रामीण भागातील गल्ली-बोळात बोगस डॉक्टर

तालुक्यातील आदिवासी ग्रामीण भागातील गल्ली-बोळात बोगस डॉक्टरांनी आपली दुकाने थाटली आहेत. स्वस्तात उपचार होत असल्याने ग्रामस्थही त्यांच्याकडून उपचार करून घेतात. यामुळे बोगस डॉक्टरांची चांगलीच चांदी होते. परंतु, या डॉक्टरांकडे कोणतेही अधिकृत शिक्षण अथवा डिग्री नसल्याने त्यांच्याकडून स्टेरॉईडचा अतिवापर केला जातो. यामुळे साईड इफेक्ट होवून रुग्णांना भविष्यात मोठे परिणाम भोगावे लागतात. बऱ्याचदा डॉक्टरांचे उपचार बेततात. त्यामुळे अशा बोगस डॉक्टरांबाबत जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडे शेकडो तक्रारी प्राप्त होत असतात.

The post नाशिक : साकी तालुक्यात बोगस डॉक्टरांचा पर्दाफाश; विना परवाना उपचार केल्याप्रकरणी कारवाई appeared first on पुढारी.