नाशिक : सिन्नरकरांना हवीय सव्वा कोटीची तातडीची मदत

सिन्नर पूरपरिस्थिती

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
गेल्या आठवड्यात सिन्नर शहरात झालेल्या ढगफुटीमुळे अंदाजे 6 कोटी रुपयांचे प्राथमिक नुकसान झाल्याचा अंदाज आहे. शहरालगतच्या भागातील शेतीपिकांसह पाच पूल तसेच घरे व दुकानांचे अतोनात नुकसान झाले आहे. सिन्नरकरांना तातडीच्या मदतीसाठी जिल्हा प्रशासनाने 1 कोटी 21 लाख 85 हजार 550 रुपयांच्या मदतीचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला आहे.

सिन्नर शहर व परिसरात गेल्या गुरुवारी (दि. 1) ढगफुटी झाली होती. अवघ्या दोन तासांत 165 मिमी पाऊस बरसला. शहरातील सरस्वती नदीला पूर येऊन मुख्य बाजारपेठेसह रहिवासी भागात पाणी घुसले. पुराच्या या पाण्यामुळे स्थानिकांची घरे, दुकाने व अन्य मालमत्तांचे प्रचंड नुकसान झाले. ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी सिन्नर शहराचा दौरा करून तातडीने नुकसानीचे पंचनामे पूर्ण करण्याचे आदेश यंत्रणांना दिले. तसेच कोकण व कोल्हापूरच्या धर्तीवर मदत देण्याची घोषणा महाजन यांनी केली होेती. त्यानुसार तहसीलदार व नगर परिषदेने पंचनाम्यांची कामे हाती घेतली आहे.

ढगफुटीमुळे सिन्नर शहरात सहा कोेटी रुपयांच्या आसपास नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज प्रभारी तहसीलदार सागर मुंदडा यांनी वर्तविला आहे. शहरातील पाच पुलांसह शेतीपिके तसेच अन्य मालमत्तांचा समावेश आहे. पुलांच्या डागडुजीसह अन्य भरपाईसाठी जवळपास पावणेचार कोटी रुपयांच्या निधीची आवश्यकता आहे. दरम्यान, अधिकृत क्षेत्रातील 202, तर अतिक्रमित क्षेत्रातील 393 असे एकूण 595 घरे, दुकाने व टपर्‍यांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे या नागरिकांना तातडीने भरपाईसाठी प्रशासनाने शासनाकडे 1 कोटी 21 लाख 85 हजार 550 रुपयांच्या मदतीचा प्रस्ताव पाठवला आहे.

अतिक्रमित क्षेत्रातील अपात्र
प्रकार  संख्या    रक्कम
घरे     105     14,90,200
दुकाने  177    73,28,850
टपर्‍या 111    10,66,500

शासन निर्णयानुसार मदत
5 दुकान 3,50,000
195 घरे 19,50.000

हेही वाचा :

The post नाशिक : सिन्नरकरांना हवीय सव्वा कोटीची तातडीची मदत appeared first on पुढारी.