नाशिक : विसर्जन मिरवणुकीस उशीर केल्यास गुन्हा, बैठकीत झाले ‘हे’ निर्णय

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीतील शेवटच्या मंडळालाही विसर्जनस्थळी जाता यावे, यासाठी मिरवणुकीत सहभागी होणार्‍या मंडळांची सकाळी 11 वाजताच मिरवणूक सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मिरवणुकीस उशीर केल्यास संबंधित मंडळांच्या पदाधिकार्‍यांवर गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी बैठकीत सांगितले.

भद्रकाली पोलिस ठाण्यात मंगळवारी (दि. 6) सकाळी झालेल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी व पोलिसांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. शहरातील सार्वजनिक गणेशोत्सवात दरवर्षी वाकडी बारव येथून पारंपरिक पद्धतीने गणेश विसर्जन मिरवणूक काढली जाते. त्यात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे गणपती देखावे, लेजीम, ढोल पथक, पारंपरिक वाद्यांच्या गजरात ही मिरवणूक काढतात. त्यामुळे विसर्जन मिरवणुकीत दरवर्षी 15 ते 20 चित्ररथ, देखावे, विद्युत रोषणाई केलेली वाहने, जनरेटर व्हॅन जात असतात. मात्र, मिरवणुकीस उशीर झाल्यास अनेक मंडळांना विसर्जन स्थळापर्यंतही जाता येत नसल्याची बाब या बैठकीत मांडण्यात आली. त्यामुळे वेळेचे नियोजन करून मिरवणूक सकाळी 11 वाजता सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याचप्रमाणे वेळेत मिरवणूक सुरू न करणार्‍यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. या बैठकीत परिमंडळ एकचे पोलिस उपआयुक्त अमोल तांबे, सरकारवाडा विभागाच्या सहायक आयुक्त दीपाली खन्ना, वरिष्ठ पोलिस निरीक्षक दत्ता पवार, सुनील रोहकले, साजन सोनवणे, रियाज शेख यांच्यासह सार्वजनिक गणेश मंडळाचे समीर शेटे, गजानन शेलार, विनायक पांडे, सुनील बागूल आदींसह 21 मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते.

बैठकीत झालेले निर्णय
विसर्जन मिरवणूक सकाळी 11 वाजताच निघेल व रात्री 12 पर्यंत सुरू राहील.
मिरवणुकीला उशीर केल्यास गुन्हे दाखल करणार.
सन 2019 च्या मिरवणुकीप्रमाणेच मंडळांचे क्रम असतील.
मिरवणूक रेंगाळणार नाही, याची दक्षता घ्यावी.
मिरवणूक मार्गातील स्वागत स्टेज डाव्या बाजूला असतील.
मंडळाजवळ जाऊन स्वागत व सत्कार करणे.

हेही वाचा :

The post नाशिक : विसर्जन मिरवणुकीस उशीर केल्यास गुन्हा, बैठकीत झाले 'हे' निर्णय appeared first on पुढारी.