नाशिक : सुषमा अंधारेंविरोधात वारकरी आक्रमक, टाळ-पखवाज वाजवित आंदोलन

नाशिक वारकरी आंदोलन,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्याविरोधात वारकऱ्यांनी मंगळवारी (दि. २७) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. यावेळी ज्ञानोबा-तुकारामाचा जयघोष व टाळ-पखवाज वाजवित अंधारे यांचा निषेध नोंदविताना अंधारे यांच्यावर फौजदारी कारवाईची मागणीदेखील करण्यात आली.

अखिल विश्व वारकरी परिषदेच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या आंदोलनानंतर निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे की, अंधारे या वारकरी संप्रदायाविराेधात बेताल वक्तव्ये करत आहेत. अलीकडेच त्यांनी संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केले आहे. अंधारेंकडून देण्यात येणाऱ्या रामायण व महाभारताच्या दाखल्यांमुळे हिंदूंच्या भावना दुखावल्या आहेत त्यामुळे त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करून कारवाई करावी. अन्यथा वारकरी संप्रदायाकडून तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे.

निवेदनावर परिषदेचे संस्थापक अध्यक्ष अनंतदास महाराज वजवाडेकर, संजयदास महाराज शिंदे, नितीन सातपुते, सोपान महाराज गायकवाड, सोमनाथ भुसारे आदींची नावे आहेत. आंदोलनात मोठ्या संख्येने वारकरी सहभागी झाले होते.

हेही वाचा :

The post नाशिक : सुषमा अंधारेंविरोधात वारकरी आक्रमक, टाळ-पखवाज वाजवित आंदोलन appeared first on पुढारी.