पाऊस आला रे..! येवला, सिन्नर, चांदवड, निफाडमध्ये बरसल्या जोरदार सरी

पाऊस www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

मान्सूनची चातकासारखी आतुरतेने वाट पाहणाऱ्या जिल्हावासीयांसाठी खूशखबर आहे. शनिवारी (दि. २४) येवला, सिन्नर, चांदवड व निफाड तालुक्यांत मान्सूनच्या जोरदार सरी बरसल्या. या पावसाने तालुकावासीयांमध्ये आनंद संचारला आहे. पुढील दोन दिवसांत उर्वरित जिल्ह्यात सर्वदूर पाऊस सक्रिय होईल, असा अंदाज हवामान विभागातर्फे वर्तविण्यात आला आहे.

गेल्या पंधरवड्यापासून कोकण किनारपट्टी भागात अडकून पडलेल्या मान्सूनचा पुढील प्रवास वेगाने सुरू झाला आहे. मुंबई तेथील उपनगरांसह ठाणे व आसपासच्या भागात वर्दी देणाऱ्या पावसाने नाशिक जिल्ह्याच्या काही तालुक्यांत जोरदार सलामी दिली. येवला शहर व तालुक्यात शनिवारी (दि. २४) दुपारपासून पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे चार महिन्यांपासून उन्हाचा कडाका सहन करणाऱ्या येवलावासीयांनी पहिल्या पावसात भिजण्याचा आनंद लुटला. याशिवाय सिन्नर तालुक्याच्या काही गावांमध्येही पावसाने हजेरी लावली. उशिरा का होईना, पावसाला सुरुवात झाल्याने बळीराजा सुखावला आहे.

चांदवड आणि निफाड तालुक्यांतही पावसाने सलामी दिली. या दोन्ही तालुक्यांत विविध ठिकाणी जोरदार सरी बरसल्या. त्यामुळे हवेतील उष्मा संपुष्टात येऊन गारवा निर्माण झाला आहे. उर्वरित जिल्ह्याला पावसाची प्रतीक्षा कायम आहे. मात्र, लवकरच ती संपुष्टात येणार आहे. कारण मान्सूनसाठी सध्या पोषक हवामान आहे. मुंबई, कोकण किनारपट‌्टीसह विदर्भात त्याने चांगला जोर धरला आहे. मराठवाड्यातही पावसाने प्रवेश केला आहे. येत्या दोन दिवसांत संपूर्ण नाशिक जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्रातील अन्य जिल्ह्यात पाऊस हजेरी लावेल, असा अंदाज आहे.

जूनमध्ये प्रचंड तूट

दरम्यान, जिल्ह्यात जूनचे सरासरी पर्जन्यमान १३९.५ मिमी असताना, आजमितीस केवळ २२ मिमी पर्जन्य झाले असून, त्याचे प्रमाण १५.५ टक्के इतके आहे.

लासलगावी आगमन

लासलगाव : शनिवारी सायं. 4 च्या दरम्यान शहरात वरुणराजाने जोरदार आगमन केल्याने उष्णतेने व्याकूळ झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला. पावसाने सुमारे एक तास जोरदार हजेरी लावल्यामुळे शहरातील रस्ते जलमय झाल्याचे दिसून आले. अखेर जून महिन्याच्या शेवटी लासलगाव व परिसरात मान्सूनचे आगमन झाले. शनिवारी सकाळपासून परिसरात ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. एकीकडे पाऊस नाही आणि दुसरीकडे उष्णतेने लासलगावकर हैराण झाले होते. मात्र पाऊस झाल्याने नागरिकांसह शेतकरी सुखावले आहेत. पहिल्या पावसात शहरातील बाळगोपाळांनी पावसात भिजण्याचा मनमुराद आनंद घेतला. दरवर्षीप्रमाणे 7 जूनला मृगात पाऊस झाला की, परिसरात पेरण्या केल्या जातात. मात्र मध्ये पावसाने हजेरी लावली होती. त्यानंतर पावसाने पाठ फिरवली. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले होते. अजूनही पेरणीसाठी बळीराजा पावसाच्या प्रतीक्षेत आहे.

The post पाऊस आला रे..! येवला, सिन्नर, चांदवड, निफाडमध्ये बरसल्या जोरदार सरी appeared first on पुढारी.