सकल मराठा समाजाचे सरकारविरोधात बोंबाबोंब आंदोलन

साखळी उपोषण pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
मनोज जरांगे-पाटील यांची प्रकृती खालावली असतानाही राज्य सरकार मराठा आरक्षणावर कुठलेच पाऊल उचलत नाही. मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी चुप्पी साधली असून, ही बाब निषेधार्ह आहे. जरांगे-पाटील यांच्या मागण्या मान्य करून त्यांचे उपोषण न थांबविल्यास गुरुवारपासून (दि. १५) महाराष्ट्रात उद्रेक बघावयास मिळेल, असा इशारा सकल मराठा समाजाच्यावतीने राज्य सरकारला देण्यात आला. यावेळी सरकारविरोधात बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले.

सीबीएस, जिल्हा न्यायालयासमोरील शिवतीर्थ येथे मराठा बांधवांनी एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण केले. यावेळी जरांगे-पाटील यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करण्यात आली. त्याचबरोबर राज्य सरकारविराेधात तीव्र शब्दात रोषही व्यक्त करण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मंत्रिमंडळाने जरांगे-पाटील यांचा मुंबईच्या दिशेने निघालेला मोर्चा वाशी, नवी मुंबई येथे थांबवून सगेसोयरे हा कायदा बनवून मराठा समाजाचा सरसकट ओबीसीत समावेश करण्यासाठीचा मसुदा तयार करण्याबाबतचा अध्यादेश दिला होता.

यासाठी विशेष अधिवेशनात मसुदा कायद्यात रुपांतरी करून मराठा आरक्षणाचा प्रश्न निकाली काढला जाणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले होते. यावेळी मराठा बांधवांनी मुख्यमंत्र्यांवर गुलाल उधळत आनंद व्यक्त केला होता. याशिवाय मुख्यमंत्र्यांनी छत्रपती शिवरायांची शपथ घेवून मराठा समाजाची फसवणूक करणार नसल्याचे स्पष्ट केले हाेते. मात्र, आंतरवली सराटी येथे गेल्या १० फेब्रुवारीपासून सुरू असलेल्या जरांगे-पाटील यांच्या आमरण उपोषणाकडे ज्या पद्धतीने दुर्लक्ष केले जात आहे, त्यावरून मुख्यमंत्री व मंत्रिमंडळ समाजाची सरळ-सरळ फसवणूक करीत असल्याचे दिसून येत आहे. अशात जरांगे-पाटील यांच्या मागण्या मान्य न केल्यास राज्यात उद्रेक होईल, असा इशारा यावेळी मराठा समाजाकडून देण्यात आला. याप्रसंगी करण गायकर, नानासाहेब बच्छाव, चंद्रकांत बनकर, नितीन रोटे-पाटील, ज्ञानेश्वर कवडे, योगेश नाटकर, राजेंद्र शेळके, विकी गायधनी, वैभव दळवी, संदीप फडोळ, नितीन पाटील, कृष्णा धोंडगे, भारत पिंगळे यांच्यासह समाजबांधव उपस्थित होते.

पाणी घ्या, पाणी घ्या…
आंदोलनस्थळी शाळकरी मुलांनी देखील हजेरी लावत ‘पाणी घ्या, पाणी घ्या मनोज जरांगे काका पाणी घ्या’ अशी आर्त साद दिली. यावेळी मुलांनी आपल्या भावना व्यक्त करीत, आरक्षण मिळेलच पण तब्येत जपा अशा प्रतिक्रिया व्यक्त केल्या. आमच्या शिक्षणासाठी तुम्ही लढत आहात, पण आम्हाला तुमची चिंता असल्याचेही विद्यार्थ्यांनी यावेळी बोलून दाखविले.

मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द न पाळल्यास गुरुवारपासून (दि.१५) महाराष्ट्रातील एकही खासदार, आमदार, मंत्र्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही. जरांगे-पाटील यांना काही झाल्यास महाराष्ट्रातील परिस्थिती बिघडवायला मराठे मागेपुढे बघणार नाहीत. त्यामुळे मंत्रिमंडळाने तत्काळ मराठा समाजाचा प्रश्न निकाली काढून त्यांचे उपोषण थांबवावे. – करण गायकर, राज्य समन्वयक, मराठा क्रांती मोर्चा

मराठा समाजाच्या भावना तीव्र असून, सरकारने वेळकाढूपणा करू नये. १५ फेब्रुवारीला विशेष अधिवेशन बोलावून मराठा समाजाचा जो मसुदा तयार केला, त्याचे कायद्यात रुंपातर करावे. सध्या सरकार ज्या पद्धतीने चालढकल करीत आहे, त्यावर सरळ-सरळ ते समाजाची दिशाभूल करीत आहे. मराठे आक्रमक झाल्यास, त्यास सरकार जबाबदार असेल. – नानासाहेब बच्छाव, उपोषणकर्ते.

हेही वाचा:

The post सकल मराठा समाजाचे सरकारविरोधात बोंबाबोंब आंदोलन appeared first on पुढारी.