दिंडाेरीत पवार गटाकडून इच्छुकांची चाचपणी, दोन दिवसांत उमेदवाराची घोषणा

शरद पवार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- लोकसभेच्या दिंडाेरी मतदारसंघात शरद पवार गटाकडून तिकिटासाठी इच्छुकांचा ओढा वाढतो आहे. माकपचे माजी आमदार जे. पी. गावित यांचे चिरंजीव इंद्रनील यांनीदेखील पवार गटाकडे उमेदवारीची इच्छा व्यक्त केल्याचे समजते आहे. त्यामुळे इच्छुकांची वाढती संख्या लक्षात घेता पवार गटाकडून योग्य उमेदवारासाठी चाचपणी केली जात असून, पुढील दोन दिवसांत त्याबाबतचा अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे.(Lok Sabha Election 2024)

उत्तर महाराष्ट्रातील नाशिक मतदारसंघ हा सध्या राज्यात चर्चेचा विषय ठरला आहे. महायुतीत या मतदारसंघातील गुंता वाढला असताना दिंडोरी मतदारसंघाचे चित्रही अद्याप अस्पष्टच आहे. महायुतीने या मतदारसंघात उमेदवार देत निवडणुकीत आघाडी घेतली. परंतु, दुसरीकडे महाविकास आघाडीतील शरद पवार गटाकडून उमेदवारांची चाचपणी सुरू आहे. पवार गटाकडून जिल्हा परिषदेचे माजी सदस्य भास्कर भगरे यांचे नाव अंतिम केले जाईल, असा दावा केला जात होता. परंतु गेल्या आठवड्याभरात पवार गटातून लढण्यासाठी अनेकजण पुढे आले. त्यामध्ये माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचे नाव आघाडीवर होते. पण, चव्हाणांनी याबाबत अधिकृत दुजोरा दिलेला नाही. त्यातच आता माजी आमदार गावित यांचे पुत्र इंद्रनील यांनीदेखील पवार गटातून दिंडोरीच्या रणांगणात उतरण्याची तयारी केल्याचे समजते आहे. (Lok Sabha Election 2024)

दिंडोरीतून उमेदवारी मिळावी याकरिता इंद्रनील गावित यांनी पवार गटाच्या वरिष्ठ नेत्यांशी संपर्क साधल्याची खात्रीलायक माहिती मिळते आहे. गावित सोबत आल्यास दिंडोरीत पवार गटाची ताकद वाढणार आहे. पण, त्यासोबतच मतदारसंघातील लढत अधिक काट्याची होऊ शकते. त्यामुळे या सर्व पार्श्वभूमीवर पवार गटाकडून पक्षातंर्गत उमेदवारांचा सर्व्हे करण्यात येत आहे. दोन दिवसांत या सर्व्हेचा निकाल हाती आल्यानंतर उमेदवाराच्या नावावर राज्यस्तरावरून शिक्कामोर्तब केले जाईल. त्यामुळे पक्षातंर्गत इच्छुक उमेदवारांनी सध्या ‘वेट अॅण्ड वाॅच’ची भूमिका स्वीकारली आहे. (Lok Sabha Election 2024)

नाशिकच्या जागेवर पाणी?

महाविकास आघाडीत नाशिकच्या जागेवर शरद पवार गटाने दावा सांगताना नाशिकच्या बदल्यात ठाकरे गटाला रायगडची जागा देऊ केली होती. परंतु, नाशिक हा आमचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे ही जागा सोडून दुसरी कोणतीही जागा मागावी, अशी भूमिका ठाकरे गटाचे खा. संजय राऊत यांनी घेतल्याची माहिती पवार गटातील पदाधिकाऱ्यांनी दिली आहे. त्यामुळे पवार गटाला या जागेवर पाणी फेरण्याची वेळ आली आहे.

हेही वाचा :

The post दिंडाेरीत पवार गटाकडून इच्छुकांची चाचपणी, दोन दिवसांत उमेदवाराची घोषणा appeared first on पुढारी.