पिंपळनेर : साक्रीत बॅनर फाडल्याने तणाव ; शिवसेना तालुकाप्रमुख मराठे यांचे शांततेचे आवाहन

साक्री www.pudhari.news

पिंपळनेर,(ता.साक्री) : पुढारी वृत्तसेवा
शिवसेना तालुकाप्रमुख पंकज मराठे यांच्या वाढदिवसानिमित्त लावलेले बॅनर व धार्मिक कार्यक्रमाचे बॅनर फाडल्याने परिसरासह साक्री शहरात तणाव निर्माण झाला. मात्र मराठे यांच्यासह पोलिसांनी शांतता राखण्याचे आवाहन केल्याने कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही. दरम्यान, याप्रकरणी अज्ञात समाजकंटकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिवसेनेचे तालुकाप्रमुख पंकज मराठे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या समर्थकांनी न्यू इंग्लिश स्कूलसमोर, पिंपळनेर रस्त्यालगत, सुरत नवापूर रस्त्यालगत तसेच वंजारतांडा गावात शुभेच्छापर बॅनर लावले. या बॅनरवर महापुरुषाचेंही छायाचित्र होते. मात्र, अज्ञात समाजकंटकाने संधी साधून बॅनर फाडल्याचे सकाळी निदर्शनास आले. बॅनरवर चिखलफेकही झाल्याचे चित्र होते. तसेच बॅनरच्या समोरच असलेल्या धार्मिक कार्यक्रमाचे बॅनरदेखील फाडलेले असल्याचे यावेळी समोर आले. कळंभीर येथे होणाऱ्या मूर्ती प्राणप्रतिष्ठा व भंडारा कार्यक्रमाचे हे धार्मक बॅनर होते. या घटनेची माहिती मराठे यांना कळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिस निरीक्षक रवींद्र देशमुख हे देखील पोलिसांसह घटनास्थळी दाखल झाले. यावेळी मोठी गर्दी होऊन तणावाचे वातावरण निर्माण झाल्याने पंकज मराठे यांनी कार्यकर्त्यांना शहरात शांतता व सुव्यवस्था राखण्याचे आवाहन केल्याने तणाव काहीसा कमी झाला. दरम्यान, या प्रकारानंतर पंकज मराठे यांनी कार्यकर्त्यांसह साक्री पोलिस ठाण्यात धाव घेतली. त्यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात समाजकंटकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक देशमुख यांनी घडलेल्या घटनेची चौकशी करून अज्ञात व्यक्तीविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले. तसेच सर्वांनी शांतता राखून शहरात शांतता व सुव्यवस्था राखण्याचे आवाहन केले. शिवसेना तालुकाप्रमुख पंकज मराठे यांच्यासह नगरसेवक सुमित नागरे, राहुल बोरसे, बाळा शिंदे, युवासेना तालुका प्रमुख पंकज गवळी, अशोक गिरी महाराज, गोटू जगताप, नितीन गुरव, दीपक गुरव, सतिश मोहिते आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

हेही वाचा:

The post पिंपळनेर : साक्रीत बॅनर फाडल्याने तणाव ; शिवसेना तालुकाप्रमुख मराठे यांचे शांततेचे आवाहन appeared first on पुढारी.