प्रश्न अन् समस्या न सोडवणारे वारसा हक्क मागतातच कसला? : अपक्ष उमेदवार अविनाश माळी

अपक्ष उमेदवार अविनाश महादू माळी,www.pudhari.news

नंदुरबार : नाशिक पदवीधर मतदारसंघातील अनेक प्रश्न आणि अनेक समस्या वर्षानुवर्ष न सोडवता जैसे थे ठेवणारे आता वारसा हक्क कसला मागत आहेत? त्यांना नैतिक अधिकार काय आहे? स्वतः मतदारच यंदा घराणेशाही मोडीत काढून बदल घडवायला सज्ज झाला असून अचंबित करणारे निकाल लागल्याचे नक्कीच पाहायला मिळेल; अशा शब्दात नाशिक पदवीधर मतदारसंघातील अपक्ष उमेदवार अविनाश माळी यांनी ठाम विश्वास व्यक्त केला.

अंतिम टप्प्यात आलेल्या प्रचाराविषयी माहिती देताना पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. अपक्ष उमेदवार अविनाश माळी यांनी सांगितले की, कोणत्या राजकीय पक्षाचा कोणाला पाठिंबा आहे हा मुद्दा आता गौण आहे. महाविकास आघाडीच्या घटक पक्षांची काय स्थिती आहे यावर अधिक सांगण्याची आवश्यकता नाही. दुसरीकडे पंतप्रधानांच्या प्रतिमेला काळे फासणारा उमेदवार भाजपा समर्थक स्वीकारतील का हाही प्रश्न ठळक बनला आहे. एकंदरीत आमच्यासारख्या अपक्ष उमेदवारांकडून लोकांना अधिक अपेक्षा आहे. स्वतः मतदाराने बनवलेली भूमिका हीच माझी शक्ती आहे. प्रलंबित प्रश्नांना न्याय देणारा उमेदवार लोकांना हवा होता आणि तो देण्यात मी सक्षमपणे यशस्वी होत आहे. पाच जिल्ह्यांच्या या मतदारसंघात माझ्या वतीने कार्यकर्ते, पदवीधर स्वतः संपर्क करीत आहेत. मी स्वतः कुठे थेट दूरध्वनी द्वारे तर कुठे प्रत्यक्ष संपर्कात आहे.

अविनाश माळी पुढे म्हणाले की, केवळ आमचा आणि लोकांचा कसा जिव्हाळा आहे, प्रेम संबंध कसे आहेत, एवढे सांगण्यापर्यंतच प्रस्थापित उमेदवारांची भाषणं मर्यादित राहत आहेत. सलग तीन टर्म लोकांनी संधी दिली त्याचं काय केलं? केलेल्या कामांचे ठोस दाखले त्यांनी द्यावेत; हे आमचं आव्हान आहे. ते तसले ठोस काम त्यांनी केलेले नाही म्हणूनच आज मतदारांच्या वतीने बदल घडवायला मी उभा ठाकलो आहे.

आतापर्यंत सलग निवडून आलेल्यांनी आणि तत्पूर्वी निवडून आलेल्यांनीसुध्दा नाशिक पदवीधर मतदारसंघातील मतदारांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी नेमके काय काम केले? हा सवाल घेऊनच मी अपक्ष उमेदवारी घेऊन रिंगणात उतरलो आहे. जुनी पेन्शन योजना, बेरोजगार पदवीधरांचा प्रश्न, विनाअनुदानित शाळांचा प्रश्न, ओबीसी ओपन प्रवर्गाचे प्रश्न, कंत्राटी कर्मचारी कायम करण्याचा मुद्दा सोडवण्याचं काम आतापर्यंत झालेलं नाही या दुर्लक्षित कामाला प्राधान्य देऊनच माझी वाटचाल सुरू झाली आहे.

त्यामुळेच नंदुरबार, जळगाव, धुळे, नाशिक आणि नगर या पाचही जिल्ह्यामध्ये प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. राजकीय पक्षांना अनुकूल असलेला नव्हे, तर प्रलंबित प्रश्न सोडवणारा उमेदवार मतदारांना हवा आहे आणि त्यामुळेच निकालाच्या दिवशी तुम्हाला चमत्कार पाहायला मिळेल, अचंबित करणारा निकाल लागल्याचे पाहायला मिळेल, असे शेवटी अविनाश माळी म्हणाले.

हेही वाचा :

The post प्रश्न अन् समस्या न सोडवणारे वारसा हक्क मागतातच कसला? : अपक्ष उमेदवार अविनाश माळी appeared first on पुढारी.