बकऱ्या विक्री करून घरी परतणाऱ्या व्यापाऱ्यास अडीच लाखाला लुटले

चांदवड (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा- कल्याण बाजारात बकऱ्या विक्री करून घरी परतणाऱ्या व्यापाऱ्यास मध्यरात्रीच्या सुमारास दोन दुचाकींवर आलेल्या अज्ञात चौघांनी अडवून रोख अडीच लाख रुपये व दोन मोबाईल असा एकूण २ लाख ५४ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरी करून पोबारा केला. या घटनेबाबत चांदवड पोलिसात २३ वर्षीय व्यापाऱ्याने फिर्याद दाखल केल्याने चौघाविरोधात जबरी चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे.

मनमाड येथील आमीर उर्फ शोएब जब्बार सैयद (२३, आय.यु.डी.पी, भवानी चौक, मनमाड) हा बकरी खरेदी विक्रीचा व्यवसाय करतो. आमीर उर्फ शोएब हा शनिवार (दि.१६) कल्याण येथे बकऱ्या विक्रीसाठी पिक अप वाहनाने (एम. एच. ४१, ए. यु. १८८७) गेला होता. बकऱ्या विक्रीनंतर तो पैसे घेऊन मध्यरात्री रविवारी (दि.१७) १२ वाजून ४५ मिनिटांच्या सुमारास चांदवड-मनमाड रोडने मनमाडकडे परतत असताना मागून आलेल्या दोन दुचाकींवरील चौघा अज्ञातांनी पिक गाडी अडवली. तसेच शोएबला चाकूचा धाक दाखवून त्याच्याकडील बकऱ्या विक्रीचे अडीच लाख रुपये ४ हजार रुपये किंमतीचे दोन मोबाईल असे एकूण २ लाख ५४ हजार रुपयांचा मुद्देमाल घेऊन पोबारा केला. घटनेची माहिती चांदवड पोलिसांना मिळताच निरीक्षक कैलास वाघ, उपनिरीक्षक सुरेश चौधरी यांनी घटनास्थळी धाव घेत चोरट्यांचा शोध घेतला. मात्र चोरट्यांनी घटनास्थळावरून धूम ठोकली होती. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक सुरेश चौधरी करीत आहेत.

हेही वाचा :

The post बकऱ्या विक्री करून घरी परतणाऱ्या व्यापाऱ्यास अडीच लाखाला लुटले appeared first on पुढारी.