बनावट कागदपत्रांद्वारे जमिनीचा व्यवहार, चौघांविरोधात गुन्हा

crime

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- वृद्धेच्या नावे बनावट कागदपत्रे तयार करून कोऱ्या कागदावर स्वाक्षरी व ठसे घेत मखमलाबाद शिवारातील जमिनीचे साठेखत करून व्यवहार केल्याचे भासवत वृद्धेची फसवणूक केल्याप्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सचिन त्र्यंबकराव मंडलिक (३२, रा. आनंदवली), किशोर विष्णू शिंदे (४०, रा. आनंदवली), सुरेश कारभारी गांगुर्डे (५५, रा. कामगारनगर) व उदय भास्कर शिंदे (५५, रा. मेघदूत सेंटर, सीबीएस) अशी संशयितांची नावे आहेत. संशयितांनी संगनमत करीत जानेवारी २०१४ ते डिसेंबर २०२१ या कालावधीत ही फसवणूक केल्याचे भूषण भीमराज मोटकरी (३६, रा. मुंबई नाका) यांनी फिर्यादीत म्हटले आहे. संशयितांनी भूषण यांच्या आजीच्या नावे बनावट कागदपत्रे तयार करीत स्वाक्षरी व ठसे घेतले. त्यामार्फत मखमलाबाद शिवारातील जमिनीचे साठेखत तयार करून ती विकल्याचे भासवले. तसेच भूषण यांच्या आजीचा जमिनीबाबत काही संबंध नसतानाही त्यांना जागेचा वारस दाखवून त्यांची फसवणूक केल्याचा आरोप मोटकरी यांनी फिर्यादीत केला आहे. या प्रकरणी न्यायालयाच्या आदेशानुसार चौघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. भद्रकाली पोलिस तपास करीत आहेत.

सहआरोपीला ही झटका

फेब्रुवारी २०२१ मध्ये रमेश मंडलिक यांचा सुपारी देऊन भूमाफियांनी खून केला होता. या गुन्ह्यात संशयित आरोपींमध्ये सचिन मंडलिक याच्यासह भूषण मोटकरी याचाही समावेश आहे. हा गुन्हा घडल्यानंतर तत्कालीन पोलिस आयुक्त दीपक पाण्डे्य यांनी संशयितांवर मोक्कानुसार कारवाई केली. तसेच फसवणूक झालेल्या इतरांनीही पोलिसांकडे धाव घेतली होती. त्यानंतर संशयित आरोपींपैकी एकाने फसवणूक झाल्याची फिर्याद दाखल केल्याने तो चर्चेचा विषय ठरला आहे. 

हेही वाचा :

The post बनावट कागदपत्रांद्वारे जमिनीचा व्यवहार, चौघांविरोधात गुन्हा appeared first on पुढारी.