बाजार समिती निवडणूक; लोकप्रतिनिधींची रंगीत तालीम

बाजार समिती www.pudhari.news

नाशिक  : वैभव कातकाडे 

मिनी मंत्रालयातून

तब्बल तीन वेळा स्थगित झालेल्या बाजार समिती संचालकपदाच्या निवडणुकांचा बिगुल दोन दिवसांपूर्वी वाजला. कोणत्या ना कोणत्या कारणाने कायमच या निवडणुकीला खो बसत होता. त्यामुळे पक्षीय राजकारणातील ग्रामीण भागातील कार्यकर्ते सैरभैर झाल्याचे चित्र होते. या निवडणुकांमुळे आता त्यांनादेखील एक ऊर्जा मिळाल्याचे चित्र आहे. प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या बाजार समितीमुळे या निवडणुकांच्या तयारीमुळे लोकप्रतिनिधींची भविष्यात होणार्‍या लोकसभा, विधानसभा तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रंगीत तालीमच होणार आहे.

शेतकर्‍यांना आपल्या मालाची विक्री आणि व्यापार्‍यांना त्या मालाची खरेदी सोप्या पद्धतीने करता यावी, यासाठी 1964 साली बाजार समिती संकल्पना अस्तित्वात आली. तालुक्यातील नोंदणीकृत मतदार निवडून देतील ते संचालक मंडळ बाजार समितीचे काम बघते. संचालकपदाची माळ गळ्यात पडावी यासाठी असलेल्या चुरशीमुळे अनेक इच्छुक उमेदवार बाजार समितीच्या निवडणुकीची तयारी करत आहेत. तालुक्यातील राजकारणात एन्ट्री करायची असल्यास मजूर फेडरेशन आणि बाजार समिती हा चांगला पर्याय समजला जातो.
जिल्ह्यातील 14 बाजार समित्यांच्या संचालकपदासाठी येत्या 28 आणि 29 तारखेला मतदान होणार आहे. बाजार समित्यांच्या या निवडणुकीत जिल्ह्यातील ग्रामीण भागात सक्रिय असलेले नेते कार्यकर्त्यांना बळ देण्याचे काम करणार आहेत की, प्रत्यक्ष निवडणुकीत सहभाग घेणार आहेत, हे लवकरच समजेल. महिनाभरापूर्वी झालेल्या मजूर फेडरेशनच्या निवडणुकीत याची प्रचिती आली होती. जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांचे वर्चस्व मालेगाव बाजार समितीवर आहे. नांदगाव विधानसभेचे आमदार सुहास कांदे यांनी नांदगाव मनमाड बाजार समितीवर आपला दावा ठेवला आहे. तर येवला बाजार समितीवर माजी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी आतापर्यंत एवढे लक्ष घातले नव्हते. मात्र, आता त्यांनी या निवडणुकीत आपले बळ वापरावे, अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे. पिंपळगाव बसवंत बाजार समितीमध्ये आमदार दिलीप बनकर यांचा वरचष्मा आहे, त्यांचे पारंपरिक प्रतिस्पर्धी माजी आमदार अनिल कदम यावेळी बाजार समिती ताब्यात घेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार यात शंका नाही. त्यासाठी माजी संचालक गोकुळ गिते हेदेखील प्रयत्न करत आहेत. आ. बनकर यांचे गेल्या 23 वर्षांपासून बाजार समितीवर वर्चस्व आहे. मात्र, यंदा नऊ संस्थांची 117 मते रद्द झाली असून, ही मते आ. बनकर यांच्या बाजूची असल्याची चर्चा आहे. खासदार हेमंत गोडसे यांनी नाशिक सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून सहकार क्षेत्रात एन्ट्री केली आहे. त्यामुळे बाजार समितीच्या निवडणुकीत त्यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. हे सर्व नेते बाजार समितीवर आपला दावा ठेवण्यासाठी रणनीती आखत आहेत. शिंदे गट, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे गट या निवडणुकीत समोरासमोर लढतात की, एकमेकांना मदत करून पुढच्या निवडणुकांची गणिते आखतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. कारण बाजार समिती ताब्यात आली की, जिल्हा परिषद, पंचायत समिती यांसारखी स्थानिक स्वराज्य संस्थांची तयारी करता येते. एकूणच पुढील निवडणुकांची ही नांदीच ठरणार आहे.

हेही वाचा:

The post बाजार समिती निवडणूक; लोकप्रतिनिधींची रंगीत तालीम appeared first on पुढारी.