बेझे चाकोरेतील चक्रतीर्थावर महाशिवरात्रीला पर्वस्नान

पर्वणीस्नान www.pudhari.news

त्र्यंबकेश्वर(जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा– त्र्यंबकेश्वरपासून सुमारे 12 किमी अंतरावर असलेल्या बेझे चाकोरे येथील चक्रतीर्थावर महाशिवरात्रीचे औचित्य साधत येथे पर्वस्नानाचे आयोजन करण्यात आले आहे. श्रीराम शक्तिपीठ संस्थापक महामंडलेश्वर स्वामी सामेश्वरानंद महाराज यांच्या मागदर्शनाने आणि बेझे, चाकोरे यासह पंचक्रोशीतील ग्रामस्थांच्या प्रयत्नाने हे पर्वस्नान होत आहे.

बेझेपासून तीन किमी अंतरावर असलेल्या चाकोरे येथे चक्रतीर्थ आहे. ब्रह्मगिरीवर प्रकट झालेली गोदावरी तेथून गंगाद्वार येथे व नंतर कुशवर्तात आली. मात्र, तेथून लुप्त झाली व पुढे 12 किमी अंतरावर चक्रतीर्थ येथून प्रवाहित झाली आहे. नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे होणारा सिंहस्थ कुंभमेळा पूर्वी येथे व्हायचा, असे सांगितले जाते. सन 1746 मध्ये येथे शैव-वैष्णव वाद झाला आणि त्यानंतर येथील स्नानाची प्रथा खंडित झाली.

सिंहस्थ कुंभमेळा 2015 मध्ये श्रावण वद्य एकादशीचा पर्वकाल असताना ८ सप्टेंबर २०१५ ला श्रीराम शक्तिपीठ महामंडलेश्वर स्वामी सोमेश्वरानंद महाराज, त्यांचे भक्तमंडळ आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी पर्वणी स्नान आयोजित केले होते. त्यासाठी सुमारे 80 हजार भक्त स्नानासाठी आले होते. आखाड्याच्या साधूंच्या मिरवणुका निघाल्या आणि ध्वजारोहणदेखील करण्यात आले होते. तत्कालीन आमदार निर्मला गावित, जिल्हा परिषदचे तत्कालीन उपाध्यक्ष संपतराव सकाळे यांच्यासह लोकप्रतिनिधी उपस्थित राहिले होते. त्यावेळेस आगामी सिंहस्थात येथे सुविधा निर्माण करणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र, येथे विकास झालेला नाही.

भक्तांना अपेक्षा

च्रकतीर्थावर दररोज मोठया संख्येने भाविक येतात. पर्यटन यात्रा बसदेखील येतात. येथे स्वच्छतागृह, पिण्याच्या पाण्याची सुविधा, सुरक्षेच्या दृष्टीने रेलिंग, घाट बांधणे, पायऱ्या बांधणे अशा कामांची अपेक्षा आहे. च्रकतीर्थ हे प्राचीन स्थान आहे. पुरातन शिलाहार, यादव राजांच्या कालावधीत अंजनेरीसह चक्रतीर्थदेखील प्रसिद्ध होते.

शासनाने च्रकतीर्थावर सुविधा उपलब्ध करून देण्याची आवश्यकता आहे. आगामी सिंहस्थात येथे सुविधा देऊन एक शाही पर्वस्नान आयोजित करावे. – महामंडलेश्वर स्वामी सोमेश्वरानंद महाराज, निरंजनी आखाडा

हेही वाचा :

The post बेझे चाकोरेतील चक्रतीर्थावर महाशिवरात्रीला पर्वस्नान appeared first on पुढारी.