भारतीय सैन्य दलातील धुळे तालुक्यातील न्याहळोद येथील जवान शहीद

जवान शहीद, धुळे www.pudhari.news

धुळे : पुढारी वृत्तसेवा

सियाचीन भागात ऑपरेशन मेघदूत मध्ये सेवा बजावत असताना भारतीय सैन्य दलाचे धुळे तालुक्यातील न्याहळोद येथील जवानास वीर मरण आले आहे. त्यांच्या पार्थिवावर आज दि. 6 रोजी अंत्यसंस्कार केले जाणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

धुळे तालुक्यातील न्याहळोद येथील मनोहर रामचंद्र पाटील (42) हे हवालदार पदावर भारतीय सेनादलात 9 जानेवारी 2002 रोजी भरती झाले होते. सध्या ते फिल्ड वर्कशॉप येथे भारतीय सैन्यात सियाचिन ग्लेशियर या ठिकाणी ऑपरेशन मेघदूत मध्ये सेवा बजावत होते. यावेळी 16 जुलै रोजी तेथील हवामानातील दुष्परिणामुळे त्यांना तीव्र डोकेदुखी आणि उलटीचा त्रास सुरू झाला. त्यामुळे त्याच दिवशी त्यांना तातडीने हेलिकॉप्टर द्वारे पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र रुग्णालयात उपचार सुरू असताना 5 सप्टेंबर रोजी त्यांची प्राणज्योत मालवली.

शहीद मनोहर पाटील यांचे पार्थिव हवाई मार्गाने प्रथम पुणे येथील हवाई अड्ड्यावर आणण्यात येईल. तेथून रुग्णवाहिकेद्वारे धुळे तालुक्यातील न्याहळोद येथे अंत्यसंस्कारासाठी पार्थिव आणले जाणार आहे. शहीद पाटील यांच्या पश्चात त्यांची पत्नी मायाबाई पाटील तसेच नऊ वर्षांची मुलगी, आई, वडील व चार भाऊ असा परिवार आहे. शहीद जवान पाटील यांच्या शहीद झाल्याचे वृत्त धुळे तालुक्यात येऊन धडकल्याने आमदार कुणाल पाटील यांनी शोक व्यक्त केला आहे. त्याचप्रमाणे जिल्हा प्रशासनाने देखील आवश्यक ती कार्यवाही सुरू केली आहे.

हेही वाचा :

The post भारतीय सैन्य दलातील धुळे तालुक्यातील न्याहळोद येथील जवान शहीद appeared first on पुढारी.