मध्यरात्री चाक निखळून पडलं, सकाळी जे घडलं ते धक्कादायकच

निफाड : पुढारी वृत्तसेवा- नाशिक- निफाड महामार्गावरील कोठुरे फाटा येथे नाशिककडे जाणाऱ्या महिंद्रा कंपनीच्या पिकअप गाडी (क्र. एमएच 9 ईएम 5037) चे सोमवारी (दि. 4) मध्यरात्री मागील चाक निखळून पडल्याने गाडी जागेवर थांबविण्यात आली. गाडी चालक व अज्ञात व्यक्ती रात्रीच्या अंधारात गाडी सोडून फरार झाले. सकाळी गाडीची व गाडीमधील मालाची तपासणी केली असता, गाडीमध्ये गोमांस असल्याचा संशय निर्माण झाला. हे वृत्त परिसरात पसरताच बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी गाडीकडे धाव घेत पिकअप गाडी पेटवून देत घटनस्थळावरून पोबारा केला.

या गाडीमध्ये प्रथमदर्शनी दिशाभूल करण्यासाठी जनावरांसाठी लागणारा उसाच्या बांड्याचा चारा भरलेला होता. कोठुरे फाट्याजवळ पिकअप गाडी जळत असल्याची माहिती निफाड उपविभागीय पोलिस अधीक्षक नीलेश पालवे व निफाड पोलिस निरीक्षक नंदकुमार कदम यांना कळताच त्यांनी निफाड नगरपंचायतीच्या अग्निशमन गाडी व पोलिस ताफ्यासह घटनास्थळी धाव घेतली. तोपर्यंत अज्ञातांनी पोबारा केला होता. अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी गाडी विझविली. ही गाडी विझविल्यानंतर क्रेनच्या मदतीने पिकअप गाडी निफाड पोलिस घेऊन गेले. गाडीमधील मांस गायीचे अथवा कोणते आहे, हे तपासणीसाठी लॅबमध्ये पाठविण्यात येणार असल्याची माहिती पोलिस निरीक्षक कदम व डॉ. सुनील अहिरे पशुधन विकास अधिकारी निफाड यांनी दिली. या गाडीतील संशयास्पद मांस शासकीय जागेत खड्डा घेऊन बुजविण्यात आले आहे.

तसेच घटनास्थळी कोणताही अनर्थ घडू नये म्हणून निफाड उपविभागीय पोलिस अधीक्षक नीलेश पालवे, निफाड पोलिस निरीक्षक नंदकुमार कदम, सहायक पोलिस निरीक्षक ईश्वर पाटील, पोलिस उपनिरीक्षक आनंद पटारे, विश्वनाथ निकम, ज्ञानेश्वर सानप, विलास बिडगर, सागर सारंगधर, योगेश आव्हाड आदींनी चोख बंदोबस्त ठेवून वाहतूक सुरळीत ठेवली. या प्रकरणी अज्ञाताविरोधात निफाड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

The post मध्यरात्री चाक निखळून पडलं, सकाळी जे घडलं ते धक्कादायकच appeared first on पुढारी.