मराठा आंदोलनाचा फटका; नगरपरिषद भरती परीक्षा पुढे ढकलल्या

लेखी परीक्षा

पुढारी ऑनलाइन डेस्क : राज्यात मराठा आरक्षण आंदोलन पेटले आहे. आंदोलनाला हिंसक वळण आल्याने राज्यभरात त्याचे तीव्र पडसाद उमटत आहेत.  या आंदोलनाचा फटका आता स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणा-या विद्यार्थ्यांना देखील बसला आहे. मराठा आंदोलनाची वाढती धग पाहाता महाराष्ट्र नगरपरिषद राज्यसेवा गट-क च्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

राज्यभर सुरु असलेल्या विविध आंदोलनांमुळे काही जिल्ह्यात संचारबंदी आदेश लागू करण्यात आले आहेत. इंटरनेट सुविधा देखील बंद करण्यात आली आहे. तसेच एसटी महामंडळाने देखील या आंदोलनाचा धसका घेत अनेक भागात बसेस बंद केल्या आहेत. त्यामुळे नगरपरिषद प्रशासन संचालनालय अंतर्गत महाराष्ट्र नगरपरिषद राज्यसेवा संवर्गामधील विविध पदांच्या भरतीसाठी घेण्यात येणा-या परीक्षा स्थगित करुन त्या अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

2 नोव्हेंबर व 3 नोव्हेंबर या कालावधीत महाराष्ट्र नगरपरिषद अभियांत्रिकी सेवा; स्थापत्य, गट-क(श्रेणी अ,ब,क), पाणिपुरवठा जलनि:सारण व स्वच्छता अभियांत्रिकी सेवा गट-क(श्रेणी अ,ब आणि क), लेखापाल \लेखापरीक्षक गट-क (श्रेणी-अ,ब, आणि क) या पदांसाठी या परीक्षा होणार होत्या. मात्र त्या आता पुढे ढकलण्यात आल्या आहेत. सुधारीत तारखा संचालनालयाच्या वेबसाईटवर लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार आहेत.

The post मराठा आंदोलनाचा फटका; नगरपरिषद भरती परीक्षा पुढे ढकलल्या appeared first on पुढारी.