महाबोधीवृक्ष फांदी रोपणातून सामाजिक ऐक्याचा लौकिक जगभर पोहोचणार : मुख्यमंत्री शिंदे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे.www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; नाशिकच्या पवित्रभूमीत बुध्दस्मारक परिसरात महाबोधीवृक्षाच्या रोपणातून आज आपण पुन्हा एकदा तथागतांच्या शांतीच्या शिकवणीची उजळणी करणार आहोत. हे फांदी रोपण पुढच्या कित्येक पिढ्या लक्षात ठेवतील. आजच्या या ऐतिहासिक महाबोधीवृक्ष फांदी रोपणातून महाराष्ट्राचा सामाजिक ऐक्याचा, सामाजिक न्यायाचा लौकिक पुन्हा एकदा जगभर पोहोचेल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

येथील ऐतिहासिक बुद्धस्मारक, त्रिरश्मी बुद्धलेणी येथे आयोजित ऐतिहासिक महाबोधीवृक्ष भव्य महोत्सव कार्यक्रमाप्रसंगी दूरदृष्यप्रणलीद्वारे शुभेच्छा संदेश देताना ते बोलत होते. मुख्यमंत्री आपल्या संदेशात म्हणाले की, महाबोधीवृक्ष महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी सामाजिक न्याय विभागाचे कार्य कौतुकास्पद आहे. विजयादशमीच्या दिवशी आज अपूर्व असा योग जूळून आला आहे. भगवान बुद्धांचा हा शांतीचा आणि ज्ञानमार्गाचा संदेश घेऊनच भारताचे महान सुपुत्र महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सामाजिक न्यायाची दिशा दाखवली. त्यांनी आजच्याच दिवशी नागपूरच्या दीक्षाभूमीवर हजारो अनुयायांना बौध्द धर्माची दीक्षा दिली. हा भारतासाठीच नव्हे, तर जगासाठी सामाजिक न्यायाचा, सामाजिक क्रांतीचा दिवस होता. महाराष्ट्र ही पुरोगामी आणि समता-बंधुता आणि एकता या मूल्यांना आदर्श मानणारी भूमी आहे. संत-महंताची भूमी आहे. या संतांनीही आम्हाला समतेचा वसा दिला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी या भूमीला स्वाभिमानाचा मंत्र दिला. जाज्वल्य असा देशाभिमान, देव-धर्म आणि मंदिरांच्या रक्षणांचा धडा घालून दिला. महात्मा जोतिराव फुले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या थोर सुपुत्रांनी महाराष्ट्राची जडण-घडण केली. सामाजिक न्यायाच्या क्षेत्रात महाराष्ट्र अग्रेसर आणि अन्य राज्यांसाठी आदर्श म्हणून काम करत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घालून दिलेली सामाजिक न्यायाची वाटच आमच्यासाठी आदर्श आहे, त्याच आदर्शांवर आमची वाटचाल सुरू असल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांनी महोत्सवासाठी देश-विदेशातून आलेल्या सर्व मान्यवरांचे स्वागत करत सर्वांना शुभेच्छा दिल्या.

हेही वाचा :

The post महाबोधीवृक्ष फांदी रोपणातून सामाजिक ऐक्याचा लौकिक जगभर पोहोचणार : मुख्यमंत्री शिंदे appeared first on पुढारी.