दसऱ्याच्या मुहूर्तावर सोने, फ्लॅट, वाहन खरेदीत कोट्यवधीची उलाढाल

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या दसऱ्याच्या मुहूर्तावर सोने, फ्लॅट, वाहन, इलेक्ट्राॅनिक्स, फर्निचर खरेदीतून कोट्यवधीची उलाढाल झाल्याने, व्यापारी वर्ग सुखावल्याचे दिसून आले. सकाळच्या सत्रापासूनच ग्राहकांनी खरेदीसाठी बाजारात गर्दी केली होती. यावेळी अनेकांनी मुहूर्त साधत नवीन वस्तू खरे आणण्यास प्राधान्य दिले.

दसऱ्याच्या मुहूर्तावर सोन्यासह नवीन वस्तू खरेदीला प्राधान्य दिले जाते. विशेषत: सोने-चांदी खरेदीची परंपरा असून, शहरातील सुवर्णपेढ्यांमध्ये ग्राहकांची एकच गर्दी दिसून आली. त्याशिवाय रिअल इस्टेट क्षेत्राला देखील चांगलीच झळाळी मिळाली. फ्लॅट, प्लॉट तसेच रो-हाऊसेसची मोठ्या प्रमाणात बुकींग झाली. बांधकाम व्यावसायिकांच्या मते, गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत यंदा ग्राहकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद लाभला. काही ग्राहकांनी दसऱ्याचा मुहूर्त साधत गृहप्रवेश केला. वाहन बाजारातही चैतन्याचे पर्व दिसून आले. अनेक ग्राहकांनी चारचाकी दसऱ्याच्या मुहूर्तावर घरी आणली. दुचाकी खरेदीत देखील मोठी उलाढाल झाली. शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांनी दुचाकी खरेदीसाठी गर्दी केली होती. इलेक्ट्राॅनिक बाजारात मोबाईल, फ्रीज, वॉशिंग मशीन, मिक्सर, मायक्रोवेव्ह, टोस्टर, ज्युसर, रोटी मेकर, वॉटर प्युरिफायरसह स्मार्ट टिव्हीची खरेदी केली. रेडिमेड कपडे, साड्या खरेदीसाठीही दिवसभर ग्राहकांची लगबग दिसून आली.

आॅनलाइन खरेदीही जोरात

कपड्यांपासून ते वाहनांपर्यंत सर्व काही आॅनलाइन उपलब्ध असल्याने, अनेकांनी आॅनलाइन खरेदीला प्राधान्य दिले. त्यातील बऱ्याच ग्राहकांना दसऱ्याच्या मुहूर्तावर डिलिव्हरी प्राप्त झाली. त्यामुळे आॅनलाइन पद्धतीने देखील मोठी उलाढाल झाली.

सोने खरेदी जोरात

एेन दसऱ्याच्या मुहूर्तावर सोन्याचे दर काही प्रमाणात घटल्याने ग्राहकांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून आले. रात्री उशिरापर्यंत सोने खरेदीसाठी ग्राहकांची लगबग दिसून आली. पारंपारिक सराफ पेढ्यांमधून सोने खरेदीसाठी अनेकांनी प्राधान्य दिल्याचे दिसून आले.

हेही वाचा :

The post दसऱ्याच्या मुहूर्तावर सोने, फ्लॅट, वाहन खरेदीत कोट्यवधीची उलाढाल appeared first on पुढारी.