महावितरण : वीज कनेक्शन हस्तांतरण झाले सोपे

महावितरण www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
महावितरणच्या इज ऑफ लिव्हिंग उपक्रमांतर्गत घरबसल्या जुन्या मालकाच्या नावावरील वीज कनेक्शन आपल्या नावे करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे जुने घर किंवा दुकान खरेदी केल्यानंतर वीज कनेक्शन नावावर करण्यासाठीच्या धावपळीतून ग्राहकांची सुटका होणार आहे.

उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार, महावितरणने इज ऑफ लिव्हिंग उपक्रम सुरू केला आहे. जुने घर किंवा दुकान खरेदी केल्यानंतर त्याचे विजेचे कनेक्शन जुन्या मालकाकडून नव्या मालकाच्या नावावर करण्याची सुविधा माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून महावितरणने उपलब्ध करून दिली आहे. यापूर्वी एखाद्याने जुने घर किंवा दुकान खरेदी केल्यानंतर वीज कनेक्शन आपल्या नावे करण्यासाठी ग्राहकांना महावितरणकडे अर्ज व सोबत कागदपत्रे दाखल करून प्रक्रिया शुल्क भरावे लागत होते. त्यानंतर कंपनीचे कर्मचारी पडताळणी करायचे. पण, कागदपत्रांच्या पडताळणीमध्ये वेळ जात असल्याने ग्राहकांना त्रास सहन करावा लागत होता. पण, ऑनलाइन सुविधेमुळे वेळेची खूप बचत होणार आहे. नवीन व्यवस्थेची चाचणी नुकतीच यशस्वी झाली आहे. या उपक्रमात एकाहून अधिक व्यक्तींच्या नावे घराची खरेदी असल्यास त्यांच्याशी संपर्क साधत कोणाच्या नावे कनेक्शन ट्रान्स्फर करायचे, याची निवड करण्यास सांगितले जाते. हा उपक्रम यशस्वी झाला असून, ग्राहकांना नवीन सेवेचा लाभ घेता येईल, अशी माहिती महावितरणकडून देण्यात आली.

अशी होणार नावनोंदणी...
नव्या व्यवस्थेनुसार मुद्रांक शुल्क व नोंदणी विभागाशी महावितरणची आयटी सिस्टीम जोडली आहे. नोंदणी विभागात नव्या मालकाच्या नावाची प्रक्रिया पूर्ण झाली की, महावितरणला संदेश पाठविला जातो. महावितरणकडून संबंधित ग्राहकाला एसएमएस पाठवत आवश्यक प्रक्रिया शुल्क भरण्यास कळविते. हे शुल्क ग्राहक घरात बसून ऑनलाइनही भरू शकतो. फी भरली की, विजेचे कनेक्शन नावावर होते आणि पुढील महिन्याचे बिल नव्या मालकाच्या नावाने पाठविले जाते.

हेही वाचा:

The post महावितरण : वीज कनेक्शन हस्तांतरण झाले सोपे appeared first on पुढारी.