मालेगावचे माजी महापौर रशीद शेख यांचे निधन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- ‘मालेगाव मध्य’चे माजी आमदार तथा महापौर शेख रशीद ( ६५) यांचे सोमवारी (दि.४) रात्री निधन झाले. नाशिकमधील खासगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने हळहळ व्यक्त होत आहे. (Rashid Shaikh passed away)

सबंध राजकीय कारकीर्द कॉंग्रेस पक्षात सक्रीय राहिल्यानंतर मुलगा माजी आमदार आसिफ शेख यांपाठोपाठ जानेवारी २०२२ मध्ये त्यांनी पत्नी माजी महापौर ताहेरा शेख आणि २८ नगरसेवकांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. यामागे महाविकास आघाडी सत्ता काळात कॉंग्रेसकडून विकास निधीचा आखडता हात आणि पाठबळ नसल्याची नाराजी अन् अजित पवार यांच्या माध्यमातून आश्वासक प्रतिसाद मिळत असल्याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले होते. (Rashid Shaikh passed away)

राजकारणात यशस्वीपणे ४० वर्षे पूर्ण केल्याबद्दल त्यांचा ऑक्टोबर २०२२ मध्ये भव्य नागरी सत्कार झाला होता. तेव्हा विविध पक्षीय स्थानिक नेत्यांनी त्यांना लोकसभा निवडणूक लढविण्याचे साकडे घातले होते. मालेगावकरांच्या प्रेमाविषयी कृतज्ञता व्यक्त करीत त्यांनी आगामी महापालिका निवडणूक लढविण्याची तयारी दर्शवली होती. नंतर बदलत्या राजकीय समीकरणात धुळे लोकसभेसाठी चाचपणी ही सुरू केली होती.

दरम्यान, यापूर्वी झालेल्या विविध शस्त्रक्रिया आणि वयपरत्वे प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल व्हावे लागले. स्वस्थ होत पुन्हा समाजकारणात सक्रिय झाले असतानाच दिवाळीत निमोनियासदृश्य समस्या जाणवल्याने वैद्यकीय उपचार सुरू होते. २५ नोव्हेंबरला नातीच्या लग्नात ते स्वस्थपणे सहभागी झाले होते. दरम्यान पुन्हा तब्येत खालावल्याने त्यांना नाशिकमधील नाईन प्लस हॉस्पिटलमध्ये दाखल व्हावे लागले होते. येथेच सोमवारी रात्री साडेदहा वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. सदरचे वृत्त मालेगाव वर्तुळात पोहोचताच सर्वच क्षेत्रातून हळहळ व्यक्त झाली. मंगळवारी (दि.५) सकाळी ११ वाजता आयशानगर कब्रस्तानात दफनविधी होणार आहे.

राजकीय कारकीर्द

जनता दलाचे (सेक्युलर ) मातब्बर नेते, माजी मंत्री निहाल अहमद यांचा मालेगावच्या राजकारणात दबदबा असताना शेख रशीद यांची राजकीय कारकीर्द सुरू झाली. १९८५ ते २००२ पर्यंत तीन वेळा नगरसेवक झालेत. १९९४ मध्ये नगराध्यक्षपदही भूषविले. कॉंग्रेस पक्षाने त्यांना १९९९ मध्ये विधानसभेची उमेदवारी दिली. त्यात निहालभाईंना शह देत त्यांनी राज्याचे लक्ष वेधून घेतले होते. सलग दोन वेळा विधानसभा सभागृह गाठले. २००९ मध्ये हॅटट्रिक झाली असती तर मंत्रीमंडळात वर्णी देखील लागली असती, असे बोलले जाते. मतदार संघ पुनर्रचनेचा त्यांना फटका बसल्याचा निष्कर्ष काढला गेला होता. त्या पराभवाचे उट्टे राजकीय उत्तराधिकारी, मुलगा माजी महापौर आसिफ शेख यांनी २०१४ च्या निवडणुकीत मौलाना मुफ्ती मोहम्मद इस्माईल यांचा पराभव करित काढले होते. यादरम्यान, शेख यांनी २०१७ मध्ये महापालिकेची निवडणूक लढवली. त्यात ८४ पैकी २८ असे काठावर बहुमत मिळवत, त्रिशंकू परिस्थितीत शिवसेनेसोबत युती करत सत्तेचा सोपान चढला. महापौर झालेत. दुसर्‍या टर्ममध्ये पत्नी ताहेरा शेख यांना महापौरपदी विराजमान केले. राज्यातील काँग्रेस सत्ता काळात त्यांच्याकडे महाराष्ट्र राज्य यंत्रमाग महामंडळाचे (मंत्रीदर्जा) अध्यक्षपदही होते. दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्याशी त्यांचे घनिष्ठ संबंध होते. (Rashid Shaikh passed away)

मालेगाव मध्य – बाह्यला जोडणारा दुवा, दांडगा जनसंपर्क असलेल्या शेख यांना ‘साहेब’ म्हणूनच संबोधले जात. शिक्षणाची पाटी अंधूक असतानाही असंख्य मोबाईल नंबर तोंडपाठ ठेवण्याची त्यांची स्मरणशक्ती अवाक् करणारी होती. गिरणा डॅम पाणीपुरवठा योजना, २०० खाटांचे सामान्य रुग्णालय ही त्यांच्या कार्यकाळातील उपलब्धी ठरतील.

हेही वाचा :

The post मालेगावचे माजी महापौर रशीद शेख यांचे निधन appeared first on पुढारी.