मी अपक्षच, काँग्रेस सोडलेली नाही : सत्यजित तांबे यांची स्पष्टोक्ती

सत्यजित तांबे,www.pudhari.news

नाशिक, पुढारी ऑनलाईन : नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूक काळात दिल्लीतील नेतृत्त्‍व आमच्याशी चर्चा करत होते. तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमच्या विरोधात बोलत होते. मला काँग्रेसमधून बाहेर काढण्याचे षड्यंत्र रचण्यात आले; परंतु मी भविष्यात अपक्ष राहणार असून सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचेही मार्गदर्शन घेऊन काम करत राहणार आहे, मी काँग्रेस सोडलेली नाही, असे नूतन आमदार सत्यजित तांबे (Satyajit Tambe) यांनी आज (दि. ४) पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

तांबे कुटुंबाला बदनाम करण्यासाठी, कटकारस्थान रचण्यात आले. माझा कुटुंबावर आरोप करणे, हे स्क्रिप्टेड षड्यंत्र होते. ही स्क्रिप्टेड स्टोरी माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांना अडचणीत आणण्यासाठी रचण्यात आली, असा आरोपही तांबे यांनी यावेळी केला.

गेल्या अनेक वर्षापासून काँग्रेसमध्ये निष्ठेने काम करतोय. परंतु निवडणुकीदरम्यान तांबे कुटुंबियांवर अनेक आरोप करण्यात आले. युवक प्रदेशचा अध्यक्ष असताना काँग्रेसचे संघटनात्मक काम केले. २०३० मध्ये तांबे कुटुंबाला काँग्रेसमध्ये १०० वर्ष पूर्ण होतील. युवक काँग्रेसमध्ये काम करताना ५० केसेस असलेला एकमेव मी आहे. परंतु वडील आमदार असल्याने तुम्हाला संधी देता येणार नाही,असे काँग्रेसचे प्रभारी एच. के. पाटील यांनी सांगितले. काँग्रेसची परिस्थिती वाईट असताना काम केले. चांदा ते बांदा काम केले. पक्षश्रेष्ठींकडे जेव्हा काही मागितले, तेव्हा संधी देण्यात आली नाही, असेही ते तांबे यांनी सांगितले.

दुसरी कुठेही संधी नाही, वडिलांच्या जागेवर लढण्यास एच. के. पाटील यांनी सांगितले. पण पक्षासाठी काम करूनही संधी दिली नाही. नागपूर आणि अमरावती शिक्षक मतदारसंघाचा एबी फार्म मला देण्यात आला. ११ तारखेला अर्ज भरताना चुकीचे अर्ज असल्याचे लक्षात आले. प्रदेश कार्यालयाने चुकीचे अर्ज का दिले ? चुकीचे अर्ज देणाऱ्यावर काँग्रेस काय कारवाई करणार ?, असा सवाल तांबे यांनी यावेळी केला. निवडणुकी दरम्यान, भाजप पाठिंब्यांच्या बातम्या जाणीवपूर्वक पेरल्या. काँग्रेसचा पाठिंबा मिळण्यासाठी मला पत्र द्यायला सांगितला, मला जाहीर माफी मागण्यास सांगितले, असेही तांबे यांनी सांगितले.

हेही वाचा :  

The post मी अपक्षच, काँग्रेस सोडलेली नाही : सत्यजित तांबे यांची स्पष्टोक्ती appeared first on पुढारी.