मुंबईसारखं आता नाशिक रेल्वेस्थानकातही पॉड हॉटेल

पॉड हॉटेल,www.pudhari.news

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली रेल्वेमध्ये अनेक सुधारणा केल्या जात आहे. पॉड हॉटेल ही संकल्पना त्यामधलीच एक असून एक दिवसासाठी शहरात मुक्कामी येणाऱ्या शासकीय नोकरदार तसेच छोट्या व्यावसायिकांना हॉटेल अतिशय उपयुक्त ठरेल, अशी माहिती केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दिली.

नाशिकरोड रेल्वेस्थानकातील पॉड हॉटेलचे उद्घाटन रेल्वेराज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याहस्ते शुक्रवारी (दि. ३०) सायंकाळी झाले. त्यावेळी दानवे बोलत होते. ते पुढे म्हणाले की, मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे आणि नागपूर येथे सर्वात प्रथम ही संकल्पना राबविण्यात येत आहे. यानंतर राज्यातील इतर शहरांमध्ये ही संकल्पना राबवली जाईल असे त्यांनी सांगितले.

निम्बस वास्तल्यम असे या पॉड हॉटेलचे नावे आहे. त्याचे संचालक सचिन दराडे यांनी दानवे यांचा सत्कार केला. विविध संघटना व संस्थातर्फे दानवे यांचा सत्कार करण्यात आला.  आमदार देवयानी फरांदे, भाजपचे नेते लक्ष्मण सावजी, भुसावळ रेल्वे विभागाचे व्यवस्थापक एस. एस. केडिया, विभागीय वाणिज्य व्यवस्थापक धीरेंद्र सिंग, वरिष्ठ रेल्वे अधिकारी शैलेश कौशल, डॉ. वीणा, रेल्वे सुरक्षा दलाचे वरिष्ठ निरीक्षक हरफुलसिंग, रेल्वे पोलिस ठाण्याचे महेश कुलकर्णी, उद्योजिका मंदा फड, माजी नगरसेवक दिनकर आढाव, उध्दव निमसे आदी उपस्थित होते.

मंत्री दानवे म्हणाले की, प्रवाशांना मोठ्या हॉटेलमध्ये कुटुंबासह किंवा एकटे राहण्याचा खर्च परवडत नाही. पॉड हॉटेलमध्ये कमी पैशात व सुरक्षितपणे राहता येते. येथे उतरणा-या प्रवाशांची सुरक्षा, कायदा सुव्यवस्था, स्वच्छता, सुविधा आदी जबाबदारी ठेकेदाराने व्यवस्थित पार पाडावी. पंतप्रधान नरेंद्र मोदी नाविन्यपूर्ण संकल्पना राबवत आहेत. त्यापैकी पॉड हॉटेल ही वेगळी संकल्पना आहे. मुंबईनंतर नाशिकरोड रेल्वेस्थानकात सुरु झालेला हा उपक्रम लोकप्रिय होत आहे. एक-दोन दिवसांसाठी रेल्वेस्थानकात थांबलेल्या प्रवाशांकरिता हे हॉटेल अत्यंत स्वस्त व सुरक्षित आहे. दरम्यान, नाशिकरोड रेल्वेस्थानकात फलाट क्रमांक एकवरील जुन्या तिकीट विक्री केंद्राच्या जागी हे हॉटेल सुरु झाले आहे. मुंबईनंतर नाशिकरोडला पॉड हॉटेल सुरु झाले आहे.

असे आहे पॉड हॉटेल

हे हॉटेल ही जपानी संकल्पना असून त्यांना कॅप्सूल हॉटेलही म्हणतात. नाशिकरोडला पॉड हॉटेलमध्ये चोवीस छोट्या रुम असून त्यापैकी १८ सिंगल, चार डबल, दोन फॅमिली रुम आहेत. सिंगल पॉडसाठी तीन तासाला २९९ तर बारा तासासाठी ७९९ भाडे आहे. डबल रुमसाठी ४९९ पासून १०९९ रुपयापर्यंत भाडे आहे. फॅमिली रुमसाठी तीन तासाला ६९९ तर बारा तासाला १३९९ भाडे आहे. या सर्वांसाठी सहा वॉशरुम, एसी, संगणक, गिझर, फ्री वायफाय, कॅफेटिरिया आदी सुविधा आहेत.

हेही वाचा : 

The post मुंबईसारखं आता नाशिक रेल्वेस्थानकातही पॉड हॉटेल appeared first on पुढारी.