येवला तहसिल कार्यालयातील 125 वर्षे जुने दस्त आता एका क्लीकवर

येवला तहसिल कार्यालय www.pudhari.news

येवला (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा- येवला तहसील कार्यालयातील सर्व जुन्या महसुली दस्तांचे स्कॅनिंग आणि डिजिटल स्वाक्षरी करण्याचे काम पूर्णत्वास आले आहे. यामुळे जुने दस्त एकाच क्लीकवर नागरिकांना उपलब्ध होणार आहेत.

शेतकऱ्यांचे नकलांसाठी खेटे आता वाचणार आहेत. येथील तहसील कार्यालयात सुमारे 1910 वर्षांपासूनचे दस्त जतन करून ठेवले आहेत. येथील रेकॉर्ड रूममध्ये कागदपत्रांचे गठ्ठे करून ठेवले आहेत. हे दस्तांचे गठ्ठे सांभाळताना कर्मचाऱ्यांच्या नाकीनऊ येत आहे. दररोज स्वच्छता करणे व वाळवीपासून सुरक्षा करताना कर्मचा-यांना कसरत करावी लागत आहे. मागणीनुसार दस्त शोधतानाही मोठा त्रास सहन करावा लागतो. आता या त्रासापासून मुक्तता होणार आहे.

महसुली अभिलेख अद्ययावत व संगणकीकरण उपक्रमातून येथील सर्व दस्तांचे संगणकीकरण झाले आहे. दस्तांची स्कॅनिंग प्रक्रिया पुर्ण झालेली आहे. खासरा पत्रक, जुने सात बारा, जन्म-मृत्यू नोंदी, फेरफार, कुळाचे कागदपत्र, गावठाण रेकॉर्ड, पाहणीपत्रक आदी दस्त स्कॅन करण्यात आले आहेत. त्यासाठी कर्मचाऱ्यांची नेमणूक केली होती. वेगाने ही प्रक्रिया पूर्ण झाली. यामुळे आवश्यक कागदपत्रे वेळेत मिळण्यास मदत होणार आहे.

ई-फेरफार पुर्णत्वास

फेरफार करून सातबारा उताऱ्यावर मालकी हक्कावर नोंद घेण्याची प्रचलित पद्धती अत्यंत वेळखाऊ आहे. दुय्यम निबंधक कार्यालयात खरेदी-विक्री व्यवहाराचा दस्त नोंदविल्यानंतर सर्व दस्त व अर्ज तहसील कार्यालयात दयावा लागतो. पूर्वी मंडळ अधिकाऱ्यांमार्फत सुनावणी घेऊन फेरफाराची नोंद केली जात होते. ही प्रक्रिया अत्यंत वेळखाऊ व गैरसोयीची आहे. आता ई-फेरफार पद्धती विकसित करण्यात आली आहे.

ई-रेकॉर्डचे काम युध्दपातळीवर पुर्ण करण्यात आले.

सदर काम पुर्ण करण्यासाठी मा. उपविभागीय अधिकारी, बाबासाहेब गाढवे यांचे मार्गदर्शनाखाली तसेच तहसिलदार आबा महाजन यांचे देखरेखीत नायब तहसिलदार निरंजना पराते, दादाराव साळवे, संदिप ठाकरे, विशाल डगळे, अमोल बोरनारे, प्रदिप खराटे, राहुल देवकर, अक्षय गायकवाड, योगेश उशिर, समाधान सोमासे, गितांजली सोमासे, वृषाली दाभाडे, विनायक जाधव यांनी परिश्रम घेतले.

“येवला तहसील कार्यालयातील एकुण 871476 जुन्या दस्तांचे स्कॅनिंग आणि डिजीटल स्वाक्षरी करण्याचे काम पुर्ण् झाले आहे https://aapleabhilekh.mahabhumi.gov.in/ या वेबसाईटवर जाऊन नागरीकांना जुने दस्त काढता येणार आहे. या प्रक्रियेमुळे अर्जदारांची वेळ व परिश्रम वाचण्यास मदत होणार आहे. सदर काम येवला तालुक्याचे अल्पावधीतच पुर्ण केले असुन हे काम पूर्ण करणारा येवला नाशिक जिल्हयातील दुसऱ्या क्रमांकाचा तालुका ठरला आहे.”

हेही वाचा

The post येवला तहसिल कार्यालयातील 125 वर्षे जुने दस्त आता एका क्लीकवर appeared first on पुढारी.