राज्यभरात मद्य तस्करीचे रॅकेट चालवणाऱ्या ‘दिनू डॉन’ला अटक

मद्य तस्कर जेरबंद,www.pudhari.news

धुळे : पुढारी वृत्तसेवा

राज्यभरात मद्य तस्करीचे रॅकेट चालवणारा धुळे तालुक्यातील शिरूड येथील रहिवासी दिनेश गायकवाड उर्फ तथाकथित दिनू डॉन याच्या मुसक्या आवळण्यात अखेर तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्या पथकाला यश आले आहे. परभणी जिल्ह्यातील गंगाखेड येथे बस स्थानकाजवळ त्याला पोलीस पथकाने ताब्यात घेतले आहे. आंतरराज्य टोळी चालवणाऱ्या या दिनेश गायकवाडला अटक करणाऱ्या पथकाला पाच हजार रुपयांचे रिवार्ड पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांनी जाहीर केले आहे.

राज्यातील वेगवेगळ्या शहरात बनावट दारू तयार करून विक्री करणारा दिनू गायकवाड याला अटक केल्यानंतर त्याला पोलीस अधीक्षक कार्यालयात आणण्यात आले. यावेळी पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांनी यासंबंधीची माहिती दिली. यावेळी अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी साजन सोनवणे, तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक दत्तात्रय शिंदे आदी उपस्थित होते. धुळे तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी डिसेंबर २०२२ मधे माहितीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर एमएच 41 ए यु 21 24 क्रमांकाचा ट्रक अडवला. या ट्रकची तपासणी केली असता त्यात 95 लाख 77 हजार रुपये किमतीची बनावट दारू पोलिसांनी हस्तगत केली होती. या गुन्ह्याचा प्राथमिक तपास करीत असताना धुळे तालुक्यातील कावठी शिवारात बनावट मद्याचा कारखाना सुरू असल्याची माहिती कळाली. त्यामुळे या कारखान्यावर देखील कारवाई करण्यात आली. या प्रकरणात दिनेश गायकवाड सह दहा जणांच्या विरोधात तालुका पोलीस ठाण्यात भादवि कलम 328, 482, 483, 34 सह महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

या प्रकरणात नऊ आरोपींना अटक करून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. मात्र दिनेश गायकवाड हा डिसेंबर 2022 पासून पोलिसांना गुंगारा देत होता. पोलीस तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांचे पथक त्यांच्या मागावर होते. मात्र दिनेश गायकवाड हा सतत नेपाळ, गोवा, उत्तर प्रदेश, बिहार अशा ठिकाणी त्याचे राहण्याचे ठिकाण बदलत होता. विशेषता तो कोणत्याही मोबाईल वरून बोलत नसल्याने त्याचा माग करणे मोठे जिकिरीचे बनले होते. अखेर दिनेश गायकवाड हा परभणी जिल्ह्यातील गंगाखेड शहरातील बस स्थानकाच्या परिसरात असल्याची माहिती पोलीस निरीक्षक शिंदे यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी प्रवीण पाटील, उमेश पाटील आदी पथकाला त्याला ताब्यात घेण्यासाठी पाठवले. या पथकाने सापळा लावून दिनेश गायकवाड याला ताब्यात घेतले. त्याला धुळे येथे आणण्यात आले.

वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात दहा गुन्हे

दिनेश गायकवाड यांच्या विरोधात धुळे जिल्ह्यातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात दहा गुन्हे दाखल असून राज्य उत्पादन शुल्क, नाशिक, जळगाव तसेच अन्य राज्यात देखील त्याच्या विरोधात आणखी गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांनी यावेळी दिली आहे. बनावट दारूच्या माध्यमातून तरुण पिढी नष्ट करण्याचे काम करणाऱ्या अशा कुख्यात तस्करांच्या विरोधात कठोर कारवाई करण्याचे नियोजन सुरू असल्याची माहिती देखील त्यांनी यावेळी दिली आहे.

हेही वाचा :

The post राज्यभरात मद्य तस्करीचे रॅकेट चालवणाऱ्या 'दिनू डॉन'ला अटक appeared first on पुढारी.