राज्यातील पहिल्या स्टार्टअप समिटचे उद्घाटन

स्टार्टअप समिटचे उद्घाटन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- जेव्हा मी नाशिकच्या जिल्हाधिकारीपदाची सूत्रे हाती घेतली, तेव्हा असे जाणवले की, उद्योग क्षेत्र आणि जिल्हा प्रशासन यांच्यात संवादाचा अभाव आहे. ही उणीव भरून काढण्यासाठी व जिल्ह्यातील उद्योगांना चालना देण्यासाठी आवश्यक ते सर्व पावले उचलली जातील, अशी ग्वाही जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी उद्योजकांना दिली.

सातपूर येथील निमा हाऊस येथे नाशिक इंडस्ट्रीज अॅण्ड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनच्यावतीने (निमा) आयोजित राज्यातील पहिल्या स्टार्टअप समिटच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी जीएसटी विभागाचे अतिरिक्त आयुक्त अनिल दान, एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी नितीन गवळी, उद्योग सहसंचालक लक्ष्मण शेळके, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक संदीप पाटील, राेजगार व कौशल्य विकास विभागाच्या सहाय्यक आयुक्त अनिसा तडवी, एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता नितीन रगुडे, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी एल. एस. भड, कामगार उपायुक्त विकास माळी, निमा अध्यक्ष धनंजय बेळे, सचिव निखिल पांचाळ, आयमा अध्यक्ष ललित बूब आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी म्हणाले, ‘प्रत्येक स्टार्टअप समिटमधून नवनव्या कल्पना पुढे येतात. त्या अंमलात आणणे आव्हानात्मक असते. निमा केवळ उपक्रमांचे आयोजन करीत नाही तर, त्यात उद्योजक, सामान्य लोकांना सहभागी करून घेऊन साखळी पूर्ण करीत असल्याचे सांगितले. तसेच उद्योग क्षेत्राला चालना देण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून ठोस पावले उचलली जाणार असून, त्यातून आर्थिक चक्राला गती मिळेल. उद्योजकांनी आपल्या आस्थापनेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांना प्रवृत्त करावे, अधिकाधिक मतदानासाठी हातभार लावावा, असेही त्यांनी यावेळी आवाहन केले.

अजित दान म्हणाले, देशातील उद्योगशीलता वाढविण्यासाठी स्टार्टअप उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या क्षेत्रात आपण जगात तिसऱ्या क्रमांकावर आहोत. औद्योगिक विकासाच्या शक्यता नाशिकमध्ये खूप असून, त्यासाठी स्टार्टअप समिट उपक्रम पूरक आहे. अनिसा तडवी म्हणाल्या, जिल्ह्यातील स्टार्टअप्सना प्रोत्साहन देण्याचे काम शासनाचे आहे. मात्र, निमाच्या माध्यमातून ते केले जात असल्याने विशेष अभिनंदनीय आहे. धनंजय बेळे यांनी प्रास्ताविक करताना, मुंबई-पुण्याचे लाड थांबवून आता नाशिकच्या औद्योगिक विकासाकडे शासनाने लक्ष देण्याची गरज आहे. नव्या युगात स्टार्टअपला बळ देण्यासाठी हे समिट घेण्यात आली आहे. याप्रसंगी निमाचे उपाध्यक्ष आशिष नहार, राजेंद्र अहिरे, कोषाध्यक्ष राजेंद्र वडनेरे, सहसचिव मनीष रावल, कैलास पाटील, विरल ठक्कर, नितीन आव्हाड, सतीश कोठारी, राजेंद्र कोठावदे, चंद्रशेखर सिंग आदी उपस्थित होते.

लवकरच नवे स्टार्टअप दोरण

राेजगार व कौशल्य विकास विभागाच्या सहाय्यक आयुक्त अनिसा तडवी यांनी, जुननंतर सुधारित स्टार्टअप धोरण प्रसिद्ध केले जाणार असल्याचे स्पष्ट केले. २०१८ मध्ये आलेल्या स्टार्टअप धोरणावर काम सुरू असून, नव्या धोरणामुळे स्टार्टअप्सना भरपूर संधी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

२५० स्टार्टअप्सचा सहभाग

दोन दिवसीय स्टार्टअप समिटमध्ये २५० पेक्षा अधिक स्टार्टअप्स आणि शंभरहून अधिक युवा महिला उद्योजिकांनी सहभाग घेतला आहे. यावेळी नवनव्या कल्पनांचा जणू मेळाच भरल्याचे चित्र आहे. समिटअंतर्गत निवडक स्टार्टअपचे प्रदर्शन भरले आहे. त्यात पर्यटनासाठी मोठमोठ्या बॅगा भाड्याने देण्यापासून ते शहराच्या एका भागातून दुसरीकडे पार्सल पोहोचवण्याची सुविधा देण्यापर्यंत, ई-बायसिकलपासून गेमिंगपर्यंत अनेक सर्जनशील स्टार्टअपनी सहभाग घेतला आहे.

हेही वाचा –