सुतार समाजाच्या प्रलंबित मागण्यांसाठी उपोषण

सुतार समाज उपोषण

देवळा ; सुतार समाजाच्या प्रलंबित मागण्यांसाठी अखिल महाराष्ट्र सुतार लोहार संघाचे प्रदेश अध्यक्ष सुदाम खैरनार यांच्या नेतृत्वाखाली समाज बांधवांनी मंगळवार (दि. १९)  पासून नाशिक येथे आमरण उपोषण सुरू केले आहे .

यात प्रामुख्याने सुतार समाजाचा भटक्या जमाती मध्ये समाविष्ट करण्यात यावा व लोक संख्येच्या प्रमाणात आरक्षण देण्यात यावे. लोहार समाजाला भटक्या जमातीत आरक्षण दिले आहे. मात्र सुतार समाजाला वगळण्यात आले आहे. सुतार आणि लोहार एकाच नाण्याच्या दोन बाजु आहेत. दोन्ही समाजाचे श्री. विश्वकर्मा भगवान हे एकच दैवत आहे. तसेच विश्वकर्मा विकास महामंडळाची गेल्या अनेक वर्षापासूनची प्रलंबीत मागणी आहे. आज नोकऱ्यांचे प्रमाण अत्यंत कमी झालेले आहे. असे असतांना हा समाज स्वकष्टाने व कौशल्याने रोजगार निर्माण करु शकतो. स्वतंत्र विश्वकर्मा समाज विकास महामंडळ निर्माण केले तर समाजातील अनेक होतकरु शिक्षित तरुणांना स्वतःच्या पायावर उभे राहतील यासाठी शासनाने सुतार समाजाच्या कल्याणासाठी विश्वकर्मा विकास महामंडळाची स्थापना करावी. ओबीसी विकास महामंडळात खऱ्या मागासवर्गीयांना डावलले जात असून याचा धनदांडगे लोक फायदा करुन घेतात म्हणून शासनाने स्वतंत्र विश्वकर्मा विकास महामंडळाची निर्मिती करावी. राज्यामध्ये प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी सुतार लोहार समाजाच्या विदयार्थ्यांसाठी वसतीगृहची निर्मीती करण्यात यावी, हा समाज हातावरचा असल्याने आर्थिक परिस्थिती अभावी विद्यार्थी उच्च शिक्षणा पासून वंचित राहत आहे. याची राज्य शासनाने दखल घ्यावी अशी मागणी करण्यात आली आहे. जोपर्यंत ठोस आश्वासन मिळत नाही तोपर्यंत आमरण उपोषण सुरूच राहणार असल्याची माहिती यावेळी उपोषणकर्त्यांनी दिली.

वरील मागण्यासाठी मंत्री, लोकप्रतिनिधींना वेळोवेळी निवेदने सादर केली आहेत. मात्र या मागण्यांकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष केले जात असल्याने पुन्हा शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी सुतार समाजाच्या वतीने प्रदेश अध्यक्ष सुदाम खैरनार यांच्या नेतृत्वाखाली नाशिक येथे गेल्या दोन दिवसांपासून आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे . या उपोषणाला कैलास मोरे, बळवंतराव शिंदे, बबनराव पवार,
जयवंतराव गाडेकर, किरण सुर्यवंशी, देविदास देवरे, पदमाकर भालेराव, रमेश देवळेकर, नाना खैरनार आदींनी पाठिंबा दिला आहे.

हेही वाचा :

The post सुतार समाजाच्या प्रलंबित मागण्यांसाठी उपोषण appeared first on पुढारी.