पोलिसाला धक्का देऊन चक्क पोलीस ठाण्यामधूनच चोर पळाला

इंदिरानगर पोलिस ठाणे

 इंदिरानगर ; पुढारी वृत्तसेवा– इंदिरानगर पोलीस ठाण्यात घरफोडीच्या गुन्ह्यात अटकेत असलेल्या संशयिताने पाणी पिण्याचा बहाना करीत पोलिसांनाच धक्का देऊन चक्क पोलीस ठाण्यामधूनच पोबारा केल्याची घटना सोमवारी रात्री ११:२४ वाजेच्या दरम्यान इंदिरानगर पोलीस ठाण्यात घडली आहे. एकीकडे इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत असताना गुन्हेगारांवर वाचक निर्माण करण्यास इंदिरानगर पोलीस अपयशी ठरत असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात आला आहे. यातच पुन्हा पोलिसांकडे अटकेत असलेला संशयित पोलिसांनाच धक्का देऊन पोबारा करत असल्याने पोलिसांनाच चोर दरोडेखोर सांभाळता येत नसतील तर नागरिकांच्या सुरक्षेचे काय? असा प्रश्न जागृत नागरिकांनी उपस्थित केला आहे. विशाल ज्ञानेश्वर तीनबोटे (वय २० साठेनगर, वडाळा गाव) असे पोलिसांच्या अटकेतून पोबारा करणाऱ्या संशयिताचे नाव आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवार दिनांक १८ डिसेंबर रोजी इंदिरानगर पोलीस ठाण्यात घरफोडीच्या गुन्ह्यातील संशयिताला क्राइम ब्रांच युनिट २ चे पोलीस उपनिरीक्षक संजय पाडवी यांनी इंदिरानगर पोलीस ठाण्यात सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास संशयिताला हजर केले होते. इंदिरानगर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस शिपाई किशोर रामदास देवरे यांच्या ताब्यात संशयिताला देण्यात आले होते. संशयित विशाल तीनबोटे याला अटक करायचे असल्याने पोलिसांनी त्याचा भाऊ अरुण तीन बोटे यास फोनवर अटकेची माहिती दिली होती. यानुसार पोलिसांनी स्टेशन डायरीला नोंदही केली होती. इंदिरा नगरला लॉकअप नसल्याने संशयितास अंबड पोलीस ठाणे येथे लॉकअप मध्ये ठेवण्यासाठी रात्री ११:२४ वाजेच्या दरम्यान इंदिरानगर पोलीस ठाण्यातून घेऊन जात असताना संशयिताने पोलिसांकडे पाणी पिण्यास मागितले. पोलीस पाणी देत असताना त्याने पोलीस शिपाई किशोर देवरे यांना धक्का देऊन इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या चैनल गेटच्या बाहेर असलेल्या संरक्षण भिंतीवरून उडी मारून फळ काढला. पोलिसांनी त्याचा पाठलाग केला परंतु संशयित मिळून आला नसल्याची माहिती इंदिरानगर पोलिसांनी दिली आहे.

हेही वाचा :

The post पोलिसाला धक्का देऊन चक्क पोलीस ठाण्यामधूनच चोर पळाला appeared first on पुढारी.